Breaking News

शरद दळवी यांना आदर्श स्काऊटर पुरस्कार

 अहमदनगर/प्रतिनिधी

  महाराष्ट्र राज्य स्काऊट अँड गाईड संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श स्काऊटर पुरस्कार शरद दळवी यांना

 प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, शरद उघडे, संतोष मानुरकर, विधिज्ञ कार्तिक मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. काल (रविवार) दादर, मुंबई येथील मुख्य कार्यालयात पुरस्कार सोहळा पार पडला.

 दळवी यांनी १९९१ पासून नगर तालुक्यातील नेप्ती विद्यालयातून स्काऊट विषयाला सुरवात केली. त्यांनी याचे मूलभूत प्रशिक्षण निर्मळ पिंपरी येथे काशिनाथ बुचुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.  नंतर प्रगत प्रशिक्षण व हिमालय वूड प्रशिक्षण पूर्ण केले. २९ वर्षाच्या स्काऊट चळवळीमध्ये ३ वेळेस  जिल्हा चिटणीस, २ वेळेस राज्य कार्यकारिणी सदस्य, व राज्याच्या विविध समित्यांवर काम पहिले आहे. दळवी यांनी अहमदनगर जिल्ह्यात ६ वेळा जिल्हा मेळावे, ३ राज्य मेळाव्यांचे यश्वी आयोजन केले होते.

  नुकत्याच अरणगाव येथे अवतार मेहर बाबांच्या पुण्यभुमीमध्ये जवळपास दहा हजार मुलामुलींचा    राज्यस्तरीय मेळावा मुख्य संयोजक या नात्याने त्यांनी यशस्वी पार पाडला. कमी खर्चात व नियोजनबद्ध मेळाव्याची नोंद घेत हा पुरस्कार देण्यात आला.

   दळवी यांना संस्थेचे मुख्य आयुक्त काशिनाथ बुचुडे, रवी पगारे, कैलास मोहिते, शिक्षणाधिकारी माध्यमिक दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे, दिनकर टेमकर, उत्तमराव राजळे, ज्ञानदेव पांडुळे, शशिकांत म्हस्के, बाळासाहेब भोसले, अशोक भोसले आदींचे सहकार्य मिळाले. या यशाबद्दल दळवी यांचे माजी केंद्रीय राज्य मंत्री दिलीप गांधी, खा. सुजय विखे, आ. शिवाजी कर्डीले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड आदींनी अभिनंदन केले आहे.