Breaking News

गणरायाच्या आगमनात खड्डयांचा अडथळा

अहमदनगर/प्रतिनिधी
 शहर उपनगरातील नागरिकांनी आज गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी केली होती. सर्वत्र मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नुकत्याच रिमझिम पावसामुळे शहरातील रस्त्याचे खरे स्वरुप उघडकीस पडले. रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत होते. या खड्ड्यांचा त्रास गणेश आगमनाच्या स्वागत गुंतलेल्या आबालवृद्ध, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना झाला. बहुतांशी शहर व उपनगरातील परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या कायमच होती. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या समस्येवर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. आदल्या दिवशीही गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी येणार्‍या गणेशभक्तांना देखील अशा खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत होती.
गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या गंभीर बनत चालली आहे. गणेशोत्सवामध्ये खड्डेमय रस्त्यांचा त्रास होऊ नये, यासाठी प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्येही खड्ड्यांचा मुद्दा समोर आला होता. उत्सवकाळात नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी खड्डे बुजवण्याची मागणीही करण्यात आली; मात्र, गणेशोत्सवास सुरुवात झाली तरी अद्यापही अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे चित्र होते. त्यात आता पावसामुळे आणखी भर पडली आहे. हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले तरी पावसामुळे त्यामध्ये सातत्याने अडथळे येतात. दरम्यान गणेशोत्सव काळात महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले नाही, तर नगरकरांना यंदा गणेशोत्सवात मिरवणूक, मंडळाचे देखावे पाहण्यासाठी खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारपेठेमध्ये गणेशभक्तांची गर्दी झाली होती. शहरातील गांधी मैदानासह चितळे रोड, माळीवाडा, सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, अशा विविध भागांमध्ये गणेश मूर्ती, पूजेचे साहित्याचे स्टॉल लागले होते. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांचे खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागल्यामुळे मोठे हाल झाले.