Breaking News

महाराष्ट्र पूरग्रस्तांच्या चिंतेत तर मुख्यमंत्री यात्रेत मग्न :खा.सुळे

परभणी/प्रतिनिधी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापुराने कहर केला. त्यामध्ये प्रचंड हानी झाली. सांगली, सातारा, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा राहिला. आज संबंध महाराष्ट्राला पुरग्रस्तांची चिंता आहे तर मुख्यमंत्री मात्र यात्रा व जत्रा करण्यात मग्न होते. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी केला.

  जिंतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे, सारंगधर महाराज, अजय चौधरी, अविनाश काळे, बाळासाहेब भांबळे, जि. प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्षा भावना नखाते, नगराध्यक्षा साबिया बेगम फारूखी, पं. स. सभापती इंदुताई भवाळे आदींची उपस्थिती होती.

  आघाडी सरकारने २०१२ मध्ये शून्य टक्के दराने बचत गटांना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु भाजप सरकारच्या काळात साधे कर्ज मिळणेही मुश्कील झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकारामुळे महिलांना आरक्षण मिळाले असून आज आरक्षणाला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत.

  निवडणुका जवळ येताच काही राजकारणी मंडळी कारखाना, सूतगिरणी उभारण्यासह युवकांना नोकऱ्या  देण्याचे आमिष दाखवतात. एवढेच नाही तर आमदार होण्यासाठी काही राजकारणी लोकांच्या विम्याचे पैसेही खातात, असा आरोप आमदार भांबळे यांनी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे नाव न घेता केला. गेली २५ वर्षे छत्रपती शिवरायांच्या नावावर मते मागणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र उभारला नाही.