Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘मेगा गळती’ सुरु : मुख्यमंत्री

लातूर
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहात झाली असून, विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना उमेदवार शोधण्याची नामुष्की येणार आहे. भाजपमध्ये मेगाभरती नाही मात्र, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘मेगा गळती’ सुरु झाल्याची बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. महाजनादेश यात्रेनिमित्त लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
भाजपमध्ये ठराविक नेत्यांनाच प्रवेश दिला जात आहे, त्यांना एक नवी संधी देण्याचे प्रयत्न आहे. असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी ते म्हणाले की, भाजप काही निवडक लोकांनाच प्रवेश देत आहे. युतीचा विचार करुनच पक्षप्रवेश सुरु राहतील. एखाद-दुसर्‍या जागेचा प्रश्‍न निर्माण झाला, तरी आम्ही सोडवू. मात्र तिकीट द्यावे लागतील असे चार जणच घेतले आहेत. फार तर आणखी चार-पाच घेऊ, बाकी तर पक्षात घेतच राहू, असे म्हणत त्यांनी भाजपच्या विद्यमान आमदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मूळ भाजप 97-98 टक्के आहे, घेतलेले लोक 2-3 टक्केच आहेत. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही. शक्तीसंचय केलाच पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे टायर पंक्चर झाले आहे. आता यांच्या पाठीशी उभं राहायला कोणीही तयार नाही. आरशात पाहण्याची वेळ कोणावर आली आहे, ते लोकांना चांगलंच माहिती आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या टीकेला उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी आरशासमोर उभे रहावे, त्यांना विरोधी पक्षनेता दिसेल, अशी टीका थोरातांनी केली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबाबत मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतला. भुजबळ यांच्याबद्दल शिवसेनेलाच माहिती, आम्ही काय त्यांना घेत नाही, असे म्हणत फडणवीसांनी वेळ मारून नेली. परतीचा पाऊस आला नाही, तर लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा प्रस्ताव पाठवण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे. उजनीच्या माध्यमातून लातूरच्या पाणीप्रश्‍नावर कायमचा तोडगा काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आतापर्यंत 1400 कोटींचा निधी दिला आहे.  लातूर आणि उस्मानाबादच्या वॉटरग्रीडचे टेंडर आचारसंहितेच्या आधी काढण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. मराठवाड्यातील प्रत्येक धरण एकमेकांना जोडणार असून कोकणाचं पाणी गोदावरीला देण्यासाठी जल आराखडा तयार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जल परिषदेची मान्यता असून कॅबिनेटची तत्वत: मंजुरी मिळाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.


विरोधकांचे टायर पंक्चर
काँग्रेस -राष्ट्रवादीचे टायर पंक्चर झाले आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनाही आरशात पाहण्याचा उलट सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला. राज्यात वंचित बहुजन आघाडी हे ए टीम झाली असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ही बी टीम झाली आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्यावर फडणवीस हे ज्योतिषी आहेत का अशी टीका केली. खरे तर राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची हवा संपली आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. राज्यातील जनताच त्यांच्या पाठीशी नाही. सर्व जनता ही भाजपच्या पाठीशी आहे, असे ते यावेळी म्हणाले.