Breaking News

चिदंबरमांची रवानगी नाही होणार तिहार कारागृहात

नवीदिल्ली
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अंतरिम जामीन मिळावा, या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या विनंतीची दखल घेऊन त्यावर निर्णय द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले आहेत. शिवाय कनिष्ठ न्यायालयाने जर चिदंबरम यांचा जामीनअर्ज फेटाळला, तर त्यांना तिहार तुरुंगात पाठवू नये, त्याऐवजी त्यांना घरी स्थानबद्ध करावे, असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना तूर्त दिलासा दिलासा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे, की चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाणार नाही आणि जर ट्रायल कोर्टात त्यांचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला तर ते पाच सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीतच राहतील. सुनावणीच्या वेळी चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले, की चिदंबरम 74 वर्षांचे आहेत आणि त्यांना घरी स्थानबद्ध केले जाऊ शकते. त्यामुळे कोणाला काही समस्या नसायला हवी.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला चिदंबरम यांच्या अजामीनपात्र वॉरंटविरूद्ध दाखल याचिकेवर आपण आपले उत्तर द्या, असे बजावले. चिदंबरम यांनी आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट दाखल करणे आणि कोठडीत पाठवण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.