Breaking News

मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाहीः खासदार डॉ. कोल्हे

सातारा / प्रतिनिधी
भाजपमध्ये जाण्याचे वेध लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची मनधरणी करण्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अपयश आले आहे.
डॉ. कोल्हे यांनी सोमवारी सातारा विश्रामगृहावर उदयनराजे यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली; मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीनंतर  डॉ. कोल्हे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया डॉ. कोल्हे यांनी दिली. त्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय जवळपास निश्‍चित झाल्याचे समजले जात आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सातार्‍यात आली, तेव्हा उदयनराजेंनी याठिकाणी उपस्थित राहणे टाळले होते. डॉ. कोल्हे यांनी वारंवार फोन करूनही उदयनराजे यांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे डॉ. कोल्हे यांनी अखेर सातारा विश्रामगृहावर उदयनराजे यांना गाठले; मात्र डॉ. कोल्हे उदयनराजे यांचे मन वळविण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.