Breaking News

घारगाव पोलिसांनी पकडले एक टन गोमांस

संगमनेर/प्रतिनिधी
 संगमनेर येथून पुणे-नाशिक महामार्गाने मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी एक पिकअप वाहनावर कारवाई करून घारगाव पोलिसांनी सोमवारी (दि.9) रात्री बाराच्या सुमारास एक टन गोमांस जप्त केले. मांस घेऊन जाणार्‍या वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 संगमनेरहून नाशिक-पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने गोमांस विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती बोटा व आळेफाटा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी रात्री बाराच्या सुमारास या कार्यकर्त्यांनी महामार्गावरील कुरकुंडी फाटा येथे घारगाव पोलिसांच्या मदतीने मांस असलेली एक पिकअप जीप अडवली. पोलिसांनी पिकअप (एम.एच. 14 ई एम 3929) ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये गोमांस असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पिकअप जीपमधून  एक हजार किलो वजनाचे दोन लाख रुपये किंमतीचे मांस व पिकअप जीपसह एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे मांस मोहसीन अन्वर कुरेशी (रा.संगमनेर) याने गोवंश जनावरांची कत्तल करून ते पिकअप वाहनातून मुंबई येथे पाठवले होते. पिकअप मधील सलाम गुलाम शेख (वय 22) व आलम आयुब शेख (वय 25) दोघेही (रा. इंदिरानगर, भार्मा सेल रेल्वे लाईन, कुर्ला ईस्ट, मुंबई) यांना घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मोहसीन कुरेशी याचा शोध पोलिस घेत आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहेत.