Breaking News

आर्थिक मंदीमुळे नोकरी मिळणे कठीण

नवी दिल्ली
जागतिक आर्थिक मंदीचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसत आहे. त्याचवेळी आगामी तिमाहीत  फक्त 19 टक्के कंपन्याच फ्रेशर्सना नोकर्‍या देण्याचा विचार करत आहेत. 52 टक्के कंपन्या मनुष्यबळ वाढवण्याच्या मनस्थितीत नाहीत. एका वैश्‍विक संस्थेच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.

‘मॅनपॉवर ग्रुप एम्प्लॉयमेंट आऊटलूक’ या वैश्‍विक संस्थेने मंगळवारी अहवाल प्रसिद्ध केला. देशभरातील पाच हजार 131 कंपन्यांशी ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत आर्थिक स्थिती आणि नव्या नोकर्‍यांच्या शक्यतांबाबत चर्चा केली. त्यात अवघ्या 19 टक्के कंपन्यांनी मनुष्यबळ वाढवले जाऊ शकते असे सांगितले, तर कर्मचारी संख्येत बदल होईल अशी अपेक्षा नाही, असे 52 टक्के कंपन्यांनी स्पष्ट केले. कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत काही सांगू शकत नाही, असे 28 टक्के कंपन्यांनी सांगितले.
नव्या नोकर्‍या निर्माण होण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तिमाहीत नव्या नोकर्‍या निर्माण करण्यात जपान पहिल्या, तैवान दुसर्‍या आणि अमेरिका तिसर्‍या क्रमांकावर असेल, असा अंदाज आहे.