Breaking News

शाह यांच्या देवदर्शनासाठी दुकाने, रस्ते बंद

मुंबई / प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन विघ्नहर्त्या गणेशाचे सपत्नीक दर्शन घेतले. शाह यांच्या या व्हीव्हीआयपी दर्शनावेळी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सिद्धीविनायक परिसरातील वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.

शाह हे आज पत्नीसह सिद्धीविनायकच्या दर्शनासाठी आले होते. शाह येणार असल्यामुळे सिद्धीविनायक परिसरातील हारफुलांची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रस्त्याच्या बाजूची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. तसेच शाह दर्शन घेऊन जाईपर्यंत या परिसरातील वाहतूकही थांबविण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी असलेली भाविकांची रांगही थांबविण्यात आली होती. शाह मंदिरात येण्यापूर्वी मंदिरात दर्शनासाठी असलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. शाह यांचा ताफा येताच त्यांची गाडी थेट मंदिराच्या प्रवेशद्वारात सोडण्यात आली. त्यानंतर शाह यांनी सिद्धीविनायकाची मनोभावे पूजा केली.
या वेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकरही उपस्थित होते.
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही त्याच्या निवासस्थानी श्रीगणेशाची पूजा केली. या वेळी त्याचे कुटुंबीय उपस्थित होते. सचिनने ट्विट करून सर्व भारतीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी बाप्पाची पूजा केली. या वेळी फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीसोबत श्रीगणेशाची आरती घेऊन महाराष्ट्राला सुखसमृद्धी देण्याचे साकडे श्रीगणेशाला घातले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे त्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापणा करून पूजा केली. माजी मंत्री सुरेश प्रभू आणि विनोद तावडे यांनीही घरी गणेशाची प्रतिष्ठापणा केली.