Breaking News

वाढीव पदांना मंजुरी देण्याच्या मागणीसाठी शिक्षक आक्रमक

 उच्च माध्यमिक शिक्षकांचे आझाद मैदानावर आंदोलन

कर्जत/प्रतिनिधी
 वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने मागणी मंजूर न केल्याने  आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने धरणे आंदोलन केले. आपल्या  मागण्या लवकरात पूर्ण होण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या चारुशिला चौधरी यांना निवेदन देण्यात आले.
 वाढीव प्रस्तावित पदांना त्वरित मंजूरी व नेमणूक दिनांकापासून वेतन द्यावे, आय टी शिक्षकांना अनुदान व वेतन मिळावे, हे प्रश्‍न सोडविण्यासाठी संंघटनेचे उपाध्यक्ष विलास जाधव, सचिव संजय शिंदे, प्रा.सुरेश अहिरे, सुनील पुर्णपात्रे, विलास खोपकर, शिवाजी जगताप, सुनील बैसाणे यांच्यासह अहमदनगर, सोलापूर, मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, नासिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, नांदेड, सांगली, सातारा, उस्मानाबाद,बीड, मालेगाव, रायगड, रत्नागिरी, अलीबाग, पालघर, कल्याण, ठाणे आदी भागातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी प्रा.मुकुंद आंधळकर म्हणाले की, पायाभूत पदांवरील शिक्षक हे गेल्या आठ ते दहा वर्षापासून विनावेतन काम करत आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे काम करुनसुध्दा त्यांना मागण्यासाठी वारंवार आंदोलन करावे लागत आहे. त्या सर्वांना न्याय मिळायलाच हवा.
 यावेळी प्रा. सुरेश अहिरे म्हणाले की, शिक्षण विभागाला सात हजार कोटी रुपये अनुदान अर्थ विभागाने दिले असून पायाभूत पदांवरील शिक्षकांना वेतन देण्यात येत नाही. ही शोकांतिका आहे. शिक्षकांच्या पायाभूत पदांना मान्यता मिळायलाच पाहिजे.
 यावेळी प्रा.संजय शिंदे म्हणाले, मंत्रालयातील तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जर शासनाने या पदांवरील शिक्षकांना वेतन सहित मान्यता दिल्या नाही. तर संघटना तिव्र आंदोलन करेल. त्यांचे परिणाम शासनाला भोगावे लागतील.