Breaking News

भाजपची अवस्थाही होईल राष्ट्रवादीसारखी

अण्णा हजारे यांची टीका; मोदी, फडणवीसांना मात्र भ्रष्टाचारमुक्ततेचे प्रमाणपत्र

अहमदनगर  / प्रतिनिधी
राष्ट्रवादीतून अनेक लोक सोडून जात आहेत. त्याचे कारण म्हणजे शरद पवारांचे काम आहे. साखर कारखाने, बँका लुटून खाल्लयाचा हा परिणाम असून ‘जैसी करणी वैसी भरणी’ असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र त्यांमी चारित्र्य शुद्धतेची प्रमाणपत्रे दिली.
हजारे यांनी भाजपवरही टीका केली. ते म्हणाले, की सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोक पक्षात घ्यावे लागतात. तशी मंडळी भाजप घेत आहे. जनतेने यांचा निकाल लावावा. भाजपचीसुद्धा काही वर्षात राष्ट्रवादीसारखी अवस्था होईल. हे लोक त्यांना सोडून पळून जातील. दरम्यान, हजारे यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही निष्कलंक, भ्रष्टाचारमुक्त असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधातील घोटाळ्यांची प्रकरणे गेल्या पाच वर्षांत माझ्याकडे आलीच नाहीत. मुख्यमंत्री मी जेव्हा फोन करेल, तेव्हा प्रतिसाद देतात. ते माझे ऐकतात. म्हणून गेल्या पाच वर्षांत मी सरकारचा भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने केली नाहीत, असे अण्णांनी सांगितले.
केंद्र सरकारने लोकपाल कायदा आणला. राज्य सरकारने लोकायुक्त आणण्याची कारवाई सुरू केली. विद्यमान सरकार चांगले काम करते आहे. मी चांगल्याला चांगलेच म्हणणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्याकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कसलेच पुरावे येत नाहीत. त्यामुळे मी कोणाच्या विरोधात आंदोलन करू आणि का करू?, असेही ते म्हणाले.