Breaking News

केमिस्ट संघटनेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी

अहमदनगर/ प्रतिनिधी
“केमिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य व्यवसाय करण्याबरोबरच एकत्र येऊन समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहेत. गरजूंना मदतीचा हात देत आहेत. दुष्काळात शेतकर्‍यांचे पशूधन वाचविण्यासाठी चारा तसेच पाण्याचे टँकर, पूरग्रस्तांना मदत, वारकर्‍यांना औषध वाटप हे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे’’, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
केमिस्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र बेंद्रे यांच्या पुढाकारातून अरुणोदय गोशाळेत जनावरांसाठी चारा वाटप तसेच रिमांड होम येथे निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे,  जिल्हा सचिव राजेंद्र बलदोटा, आनंद बोरा, शरद डोंगरे, संदीप कोकाटे, राहुल गोरे, महेश आठरे, सचिन मोरे, संकेत गुंदेचा, हेमंत गुगळे, नितीन गांधी, अविनाश साळुंखे, मिलींद क्षीरसागर, महेंद्र ओसवाल, नितीन बोठे, शशिकांत वाघुलकर, अमोल बोठे, ज्योती गहिले, दीपाली शेवाळे, मनीषा बारगळ आदी उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले,“रिमांड होम येथील महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणार्‍या शाळेतील निराधार विद्यार्थ्यांना मदतीची खरी गरज आहे. ती मदत केमिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य करत आहेत. ही मोठी कौतुकाची आणि समाधानाची बाब आहे.’’
यावेळी कार्याध्यक्ष राजेंद्र बेंद्रे म्हणाले, “केमिस्ट संघटनेतर्फे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मागील दुष्काळात संघटनेने शेतकर्‍यांचे पशूधन वाचविण्यासाठी चारा तसेच पाण्याचे टँकर ग्रामीण भागात दिले होते. गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, हे समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते पार पाडण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला गेला आहे’’, असे त्यांनी सांगितले.