Breaking News

सॅफ फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद भारताकडे

अंतिम लढतीत नेपाळवर 7-0 अशी एकतर्फी मात

कोलकाता
स्ट्रायकर सिद्धार्थने नोंदवलेल्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताच्या 15 वर्षाखालील युवा फुटबॉल संघाने तिसऱयांदा सॅफ चषकाला गवसणी घातली आहे. शनिवारी कोलकाता येथे झालेल्या अंतिम लढतीत भारताने नेपाळचा 7-0 असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत भारताने पाच सामन्यात 28 गोल केले व एकही गोल स्वीकारला नाही. तसेच या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक यश मिळवणारा भारतीय संघ ठरला आहे. याआधी, भारतीय संघाने 2013 व 2017 मध्ये जेतेपद पटकावले होते. प्रारंभापासून भारताने या सामन्यावर वर्चस्व ठेवताना नेपाळला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. पहिल्या सत्रात मेहसनने 15 व्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, 42 व्या मिनिटाला अमनदीपने तर सिबाजीत सिंगने 45 व्या मिनिटाला गोल करत भारताला 3-0 असे आघाडीवर नेले. मध्यंतरानंतरही भारताकडून श्रीदर्थने 51, 76 व 80 व्या मिनिटाला गोल करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. हिमांशू जांग्राने एक गोल केला. 7-0 अशी भक्कम आघाडी मिळवलेल्या युवा भारतीय संघाने ही आघाडी कायम ठेवत शानदार विजय संपादन केला. या विजयानंतर भारतीय संघाने मैदानावर एकच जल्लोष साजरा केला. युवा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय फुटबॉल महासंघाने विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.