Breaking News

पाकिस्तानात दूध १४० रुपये प्रतिलिटर

नवी दिल्ली/वृत्तसंस्था
पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेललाही मागे टाकत दुधाच्या किंमतीने उच्चांक गाठला आहे. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, दुधाचा भाव १४० रुपये (पाकिस्तानी चलन) प्रतिलिटर झाला होता. कराचीमधील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची मागणी असल्याने हे दर वाढले होते. मात्र या तुलनेत दुसरीकडे पेट्रोलचा दर ११३ रुपये तर डिझेलचा दर ९१ रुपये प्रतिलीटर होता.

  सरकारने दुधाची किंमत ठरवली असून अधिकृतरित्या ९४ रुपये प्रतिलीटर विक्री होते. तर दुकानदारांसाठी ही किंमत ११० रुपये ठरवण्यात आली आहे. मात्र तरीही काही दुकानदार १४० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची विक्री करत आहेत.

  मोहरमदरम्यान शहरातील वेगवेगळ्या भागात स्टॉल्स लावण्यात आले होते. या ठिकाणी दूध, ज्यूस तसंच थंड पाण्याचं वाटप केलं जात होतं. यामुळे दुधाची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मर्यादित दूध उपलब्ध असल्याचं सांगत काही व्यापाऱ्यांनी जाणुनबुजून दुधाचा तुटवडा निर्माण केला. ज्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ झाली असंही सांगण्यात आलं आहे. याप्रकऱणी उद्या भागधारकांची बैठक बोलावण्यात आली आहे.