Breaking News

माजी खासदार काय म्हणता, मी शिवसेनेचा नेता!

चंद्रकांत खैरे यांचा संताप; खा. जलील यांचाही टोला

औरंगाबाद / प्रतिनिधी
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले; पण हा पराभव खैरे अजूनही विसरू शकलेले नाहीश्र. त्याचा प्रत्यय एका कार्यक्रमात आला. खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख करण्यात आल्यानंतर खैरे जाम भडकले. काय माजी खासदार-माजी खासदाक्ष लावलंय. मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात, या शब्दात खैरे यांनी संताप व्यक्त केला.

औरंगाबादमध्ये क्रेडाईच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खैरे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह राजकीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम खैरे यांच्या भाषणामुळेच जास्त चर्चेत आला. अनेकांनी खैरे यांच्याबद्दल बोलताना त्यांचा माजी खासदार असा उल्लेख केला. त्यामुळे खैर भडकले. मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जात आहे. मी खासदार होतो हे सत्य असले, तरी मी आजही शिवसेनेचा नेता आहे. त्यामुळेच लोक रोज त्यांची कामे घेऊन माझ्या कार्यालयात येतात, असे सांगत खैरे यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

व्यासपीठावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनीही खैरे यांना चिमटा काढायची संधी सोडली नाही. मी खासदार झालो आहे, याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्‍वासच बसत नाही, असा टोला जलील यांनी या वेळी लगावला.