Breaking News

जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे श्रींची मिरवणूक

अहमदनगर/प्रतिनिधी
 शहरातील नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे. गणेश चतुर्थीला मंडळाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात चांदीच्या गणेशमूर्तीची मनोहारी मिरवणूक काढत मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना केली. आबालवृध्द भाविकांचा सहभाग असलेली जय आनंद मंडळाची स्वागत मिरवणूक नगरकरासांठी खास आकर्षण ठरली.  यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सेक्रेटरी  कुंतीलाल राका  आदी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सवात वेगळेपण जपत पारंपरिक पध्दतीने सर्वांना एकत्र आणणारा गणेशोत्सव साजरा करीत जय आनंद महावीर युवक मंडळांने आपली ओळख निर्माण केली आहे. या मंडळाने याहीवर्षी गणेशोत्सव स्थापना मिरवणूक अतिशय उत्साही वातावरणात काढत पारंपरिक वाद्यांचा गजर केला. पद्मनादम ढोल पथकाने या मिरवणुकीत सादरीकरण केले. नवीपेठ, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक मार्गे नवीपेठेत ही मिरवणूक दाखल झाली. चौकाचौकात ढोल पथकाने उत्कृष्ट वादन करून नगरकरांना गणेशोत्सवाची अनोखी मेजवानी दिली. या मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी, सदस्य पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते. डीजेमुक्त उत्सवाची परंपरा जपत मंडळाने श्रींच्या मूर्तींची सजविलेल्या बग्गीतून स्वागत मिरवणूक काढली. पूर्णत: शिस्तबध्द आणि तितक्याच उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली.
मंडळाच्या गणेशोत्सवाबाबत बोलताना अध्यक्ष शैलेश मुनोत म्हणाले, “नवीपेठ भागात लोकांचे प्रबोधन करणारा व लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव मंडळ दरवर्षी साजरा करीत असते. उत्सवकाळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच भाविकांच्या विनाअडथळा देखाव्यांचा आनंद घेता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकाच वेळी होणार आहेत. या काळात सर्वांनी शांतता राखून प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे. दोन्ही उत्सव चांगल्या पध्दतीने साजरे होतील, यासाठी योगदान द्यावे. यावर्षी मंडळाने नागपंचमीच्या सणाचा देखावा सादर करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.