Breaking News

शेकडो जिहादी भारतात घुसण्याचा तयारीत

पाकचा नवा डाव;गुप्तचर यंत्रणेची माहिती


नवी दिल्ली:
काश्मीरच्या मुद्द्यावर सर्वच ठिकाणी तोंडावर पडल्यानंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर दहशतवादी तळ पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच 7 लाँचपॅड तयार करण्यात आले असून 275 दहशतवादी सक्रीय झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. इतकेच नाही, तर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अफगाण आणि पश्तून शिपायांना देखील नियंत्रण रेषेजवळ तैनात करण्यात आले आहे.

 गुप्तचर यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पूर्वीही पाकिस्तानने अफगाण आणि पश्तून जिहादींचा दहशतवादासाठी वापर केलेला आहे. सन १९९० मध्येही पाकिस्तानने या जिहादींचा दहशतवादासाठी वापर केला होता.

  सन १९९० मध्ये पाकिस्तानने सर्वप्रथम अफगाण आणि पश्तून जिहादींचा प्रयोग दहशतवाद पसरवण्यासाठी केला होता. काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी युद्ध छेडण्यासाठीच पाकिस्तानने हा प्रयत्न केला होता. भारताने याला प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानने आपल्या रणनीतीत बदल केला. आता पाकिस्तान पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचाच काश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासाठी वापर करत आहे.

  पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय मिळून भारताविरोधात कारवाया करण्यासाठी संपूर्ण ताकद लावत आहेत. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान दशतवाद्यांना तयार करत आहे. तसंच लाँचपॅडही उभारण्यात येत आहे. तसंच दहशतवादी काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही समोर आली आहे