Breaking News

उदयनराजेंची राजू शेट्टी यांच्याकडून मनधरणी

भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा आग्रह 

सातारा 
विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका, अशी उदयनराजे यांना विनंती केली आहे. त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही,’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. त्यामुळे उदयनराजे आता नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
‘छत्रपती उदयनराजे हे विरोधकांमधील महत्त्वाची ताकद आहेत. याशिवाय राजे तुम्ही गेलात तर शेतकरी, कष्टकरी आणि जनसामान्यांचा कुणी वालीच राहणार नाही’, असे शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे मोठमोठे नेते पक्षांतर करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातार्‍याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले देखील भाजपात प्रवेश करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून उदयनराजेंची मनधरणी करण्याचे काम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी उदयनराजेंची भेट घेऊन यासंदर्भात बंद दरवाज्याआड चर्चा केली होती. त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे ‘मावळा छत्रपतींना फक्त विनंती करु शकतो’, असे म्हणाले होते. त्यानंतर आज म्हणजे बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उदयनराजे यांच्या सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांच्याशी बंद दरवाज्या आड चर्चा केली. राजू शेट्टी यांनी देखील त्यांना पक्ष सोडून न जाण्याची विनंती केली. उदयनराजे आज विरोधकांमधील महत्त्वाची ताकद आहेत, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी माध्यांना दिली. उदयनराजे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘मी लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर उदयनराजेंना फार वाईट वाटले होते. मला भेटून चर्चा करायची आहे, असे मत त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. आजच्या भेटीत संसदेतील अनुभव एकमेकांशी शेअर केले. काही दिवसांपासून उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. या विषयावर उदयनराजेंशी चर्चा केली. उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर जनसामान्यांचा कुणी वाली राहणार नाही. सध्याच्या परिस्थितीत उदयनराजेंची विरोधी पक्षांना खरी गरज आहे.’ दरम्यान, भाजप प्रवेशावर उदयनराजेंना प्रश्‍न विचारला असता, ‘यावर अद्यापही मी कोणताही निर्णय घेतलेला नाही’, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. त्यामुळे आता कठीण परिस्थितीत उदयनराजे आपल्या पक्षासाठी उभे राहतात का? की भाजपमध्ये प्रवेश करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.