Breaking News

खरा साक्षीदार इतिहासच !


    
     प्रारंभीच्या उघड्या जागेवरील मंदिरांना कालांतराने घरसदृश बंदिस्त मंदिरात मूर्तीची स्थापना व्हायला लागली. आणि नंतरच्या काळात आपल्या अंगभूत, निसर्गदत्त कल्पनाशक्तीच्या आधारे या मंदिर वास्तूंना कलात्मकतेचा साज चढवला गेला. प्रारंभी परिसरातील उपलब्ध साधनांच्या आधारे बांधकाम केले जायचे, तसेच पाऊसपाणी व इतर नैसर्गिक आपत्तींशी सामना करण्यासाठी वेगवेगळ्या बांधकाम साहित्याची उपयुक्तता जाणवल्याने टप्प्याटप्प्याने नवनवीन बांधकाम तंत्रज्ञान विकसित होत गेले. अनेक पुरातन मंदिरांवर सौंदर्यीकरणासाठी शिल्पकारांनी वैविध्यपूर्ण कलाकृती पेश केली. तसेच साम्राज्य विस्तारातून आलेल्या आक्रमणांच्या वास्तुशैलीचाही प्रभाव आपल्या मंदिर शिल्पावर आहेच. हा दोन संस्कृतींमधील शैलीचा मिलाफ आहे. मोठ्या आकाराची प्रार्थनास्थळे, वाड्या-गढ्या, राजवाड्यांचे बांधकाम करता करता वास्तुशास्त्र विकसित होत गेले. त्यासाठी नियोजित वास्तू उभारण्यासाठी आराखडे, नकाशे तयार करण्याची आवश्यकता भासायला लागली. दूरदृष्टीच्या इंग्रजांमुळे भारतातील मूळ स्थापत्यशास्त्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली. अस्तित्वात असलेली जागा, बांधकामाचा उद्देश, त्यासाठी होणार्‍या खर्चाचा अंदाज घेऊन नियोजित बांधकामासाठी नकाशासह बांधकामाची पूर्वतयारी करण्याची पद्धती अमलात आली. त्यात वाहतूक व्यवस्था सुलभ झाल्याने कालांतराने स्थानिक बांधकाम साहित्यावर बांधकाम अवलंबून राहिले नाही.
     इस्लामी, मुघल, ग्रीक, ब्रिटिश शैलीतील अनेक इमारतींच्या शिल्पाकृतींतून ही वस्तुस्थिती नजरेत येत असली तरी त्याला स्थापत्यशास्त्राचा दृष्टिकोन येण्यासाठी 18 वे शतक उजाडले. परकीय आक्रमणाचा जसा तोटा आहे तसा फायदाही होत असतो. दोन संस्कृतींच्या आदानप्रदानांचे अनेक कला शाखांवर त्यांचे प्रतिबिंब पडते. आक्रमणानंतर अनेक लोक स्थानिकांशी एकरुप झाले. त्यातून दोन संस्कृतींचा मिलाफ होऊन चित्ताकर्षक अनेक वास्तू निर्माण झाल्या. यापैकी बर्‍याच वास्तू त्या वेळच्या प्रशासकांनी प्रशासकीय व्यवस्थेसाठी उपयोगात आणल्या. भारतातील वास्तुवैभवात बौद्धकालीन लेण्या, स्तूप, विहार यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. देशातील 80 टक्के लेण्या महाराष्ट्र भूमीवर आहेत हे विशेष ! बौद्ध लेण्यांना जरी धर्माचं अधिष्ठान असले तरी मूळ भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेल्या अहिंसा, सहिष्णुता हा अनमोल संदेश त्याद्वारे देण्याचा प्रयत्न आहे. वेरुळच्या अप्रतिम लेणी समूहांतून हिंदू-जैन आणि बौद्घ शैलीच्या लेण्यांचा त्रिवेणी संगम हेच दाखवून देतोय.
     20व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत आपल्या देशात वारसावास्तू बांधकामाकडे एक वास्तुशास्त्रीय म्हणून बघण्याचा दृष्टिकोन नव्हता. इतकेच नव्हे, तर तोपर्यंत या विषयावर भारतीय भाषांमधून अभ्यासूपणाने परिपूर्ण लेखनही झाल्याचे आढळत नाही. आज वारसावास्तू आणि स्थापत्यशास्त्र या विषयाकडे तरुण विद्यार्थीवर्गासह पर्यटक आणि इतिहासाचे अभ्यासक वळताहेत. कारण या क्षेत्रातूनही उपजीविकेचे साधन उपलब्ध होतेय, हे जाणवतेय. शालेय, महाविद्यालयीन तसेच कौटुंबिक पारंपरिक सहलींची संकल्पना आता बदलतेय. ऐतिहासिक स्थळांसहित, वनपर्यटनाबरोबर सामाजिक पर्यटन संकल्पना आता लोकप्रिय होत आहे. पण वारसा वास्तुदर्शन सहलींकडे आपले सहल आयोजक वळलेले नाहीत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे वारसावास्तू स्थळदर्शन सहलींचे आयोजन केले जाते. पण त्यालाही अल्प प्रतिसाद आहे. युथ हॉस्टेल अ‍ॅसोसिएशन संचालित वारसा वास्तुदर्शन भटकंतीचे आयोजन केले जाते. पण त्यात त्यांच्या सभासदांचाच सहभाग दिसतोय.
     वारसावास्तू उभारणीतील ब्रिटिशांच्या नुसत्या पाऊलखुणाच उमटल्यात असे नाही, तर त्यांच्या संवर्धनासाठी ते कायम दक्ष होते. आपला वारसावास्तूंचा वैभवशाली इतिहास जपताना त्याचे साक्षीदार ठरलेले ऐतिहासिक मापदंड म्हणजे वारसावास्तू, पुतळे, स्तंभ, कमानी यांचे जतन करण्याची तळमळ आमच्या समाजमनात नाही आणि शासकीय पातळीवरही याबाबत उदासीनता जाणवते. इंग्लंडमधील शेक्सपियरचे घर, कवी किट्सचे घर या वारसावास्तू त्यांच्यासाठी राष्ट्रगौरव ठरल्या असून, पर्यटकांच्या स्थळदर्शनात त्यांचा समावेशही आहे. दुसर्‍या महायुद्धात अतुलनीय पराक्रम गाजवलेली अमेरिकेची सेंटमेरी ही युद्धनौका आजही आपलं पुरातन वैभव राखून आहे. या पार्श्‍वभूमीवर 1971 च्या बांगलादेश युद्धात भीमपराक्रम गाजवणार्‍या आमच्या ‘विक्रांत’ युद्धनौकेचा अखेरचा प्रवास खूपच केविलवाणा आणि आपल्या उदासीन मनोवृत्तीचे द्योतक वाटतो. इजिप्तमध्ये आस्वान धरण उभारताना ज्या पुरातन, वैभवशाली मंदिरांना जलसमाधी मिळणार होती त्या सर्व मंदिरांची उंच पहाडांवर पूर्ववत उभारणी करून आपला वारसा जपण्यासाठी प्रशासकांनी केलेले प्रयत्न खूपच बोलके आहेत. या मंदिर स्थलांतरांसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च केला गेला. याचं कारण म्हणजे या वारसावास्तू आमच्या राष्ट्राची अस्मिता आहे ही त्यांची धारणा आहे.
     या पार्श्‍वभूमीवर गत इतिहासात रममाण असणारा आमचा समाज आणि आमचे शासन कुठे आहे ? आमच्या पुरातन वास्तुस्थळांचा, मंदिरवास्तूंचा विकास करताना जीर्णोद्धाराच्या नावाखाली मूळ बाजाच्या, शैलीच्या वारसा वास्तुसंवर्धनाची भूमिका दिसत नाही. कारण आता मूळ कलापूर्ण वास्तुमंदिराच्या जागेवर मार्बलयुक्त चकाचक अशा या वास्तू उभारताना आमच्या प्राचीन संस्कृतीशी सुसंगत मंदिर वास्तुशिल्पाकृतीचे वैभव लुप्त होत चालले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे कोकणातील जुन्या मंदिरांचे होत असलेले नावीन्यपूर्ण जीर्णोद्धार. हे करताना मूळ वास्तू संरचना नामशेष होऊन त्यावरची अनामिक कलाकारांनी सादर केलेली काष्टशिल्पाकृती आता इतिहासजमा होत आहे.
     जसे ग्रंथालयासाठी चांगला-चोखंदळ वाचक असलेला ग्रंथपाल हवा, वनपर्यटनासाठी निसर्गाची माहेरओढ असलेला निसर्गप्रेमी मार्गदर्शक हवा, तसेच वारसावास्तूंचे महत्त्व जाणणारा असा इतिहास-संस्कृतीचा अभ्यासक असलेला मार्गदर्शक वारसा वास्तुदर्शनासाठी हवाच. पण पर्यटक-अभ्यासकांना ही महती सांगणार्‍या जाणकारांची आपल्याकडे वानवा आहे. खरंतर 21व्या शतकात गरज आहे ती असलेला इतिहास कष्टाने टिकवून ठेवण्याची. कारण भूतकाळ हा असा गुरु आहे जो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही न काही शिकवत असतो. जर इतिहास टिकवला तर पर्यायाने वर्तमानकाळ आणि अर्थातच भविष्यकाळ उज्ज्वल असेल यात तीळमात्र शंका नाही.

- प्रदिप जानकर
प्रत्येक देशाला नैसर्गिक रचनेनुसार जसा भूगोल आहे तसाच इतिहासही आहे. त्या जोडीला धार्मिक अधिष्ठान असलेली संस्कृती आहे. त्या संस्कृतीच्या ज्या पाऊलखुणा उमटल्या आहेत, त्याच्या संवर्धनासाठी जो इतिहास घडला त्याचे साक्षीदार ठरलेले जे मापदंड आजही अस्तित्वात आहेत तो म्हणजे त्या त्या राष्ट्राचा अनमोल ठेवा तसेच ऐतिहासिक वारसा म्हणून मान्यता पावलाय. यामध्ये हजारो वर्षांची पुरातन मंदिरे, स्तंभ, पुतळे, मनोरे, कमानी, गडकिल्ले यांच्याबरोबर प्रसंगानुरुप उभारलेल्या अलौकिक वास्तूही आहेत. उपरोक्त घटकांपैकी काही म्हणजे राष्ट्राची अस्मिताच झाली आहे, तर काहींना राष्ट्रगौरवाची शान आहे. प्राचीन इतिहासाच्या पार्श्‍वभूमीच्या आजही अस्तित्वात असलेल्या या चित्ताकर्षक वारसावास्तूंच्या प्रगतीचा आलेखही तितकाच जुना आहे. अन्न, वस्त्र, निवार्‍याची प्राथमिक गरज भागल्यावर, स्थैर्य प्राप्त झाल्यावर सुरक्षेचा प्रश्‍न मानवासमोर होताच. सभोवतालच्या अफाट निसर्गाचे रहस्य ध्यानी येण्याची कुवत नसल्याने नैसर्गिक आपत्तीसमोर कोणत्या तरी अज्ञात शक्तीपुढे श्रद्धायुक्त माथा टेकण्याच्या उद्देशाने मंदिर वास्तूंची उभारणी झाली.
वारसा वास्तू म्हणजे आपल्या अनामिक पूर्वजांनी आपले सर्वस्व वेचून निर्माण केलेली अजरामर कलाकृती आहे. भूलोकीचा स्वर्ग ठरलेली ही कलाकृती म्हणजे फक्त ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक कलाकृतीचा आविष्कार नव्हे, तर त्याच्या अस्तित्वाने राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय एकात्मता, सद्भावना जोपासायला त्याचे अस्तित्व आधारभूत ठरेल. दरवर्षी जागतिक वारसा दिन साजरा करण्यामागे हेच अभिप्रेत आहे.