Breaking News

कोरेगाव भीमाप्रकरणी दिल्लीच्या प्राध्यापकाच्या घरावर छापा

Koregaon Bhima Monument
पुणे / प्रतिनिधी
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या घरी मंगळवारी छापा मारला. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 2018 मध्ये कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणत हिंसाचार उफाळला होता. पोलिसांना संशय आहे, की हा हिंसाचार भडकवण्यामागे नक्षलवाद्यांचा हात होता.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात मानविधकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, व्हनरेन गोन्सालविस, पी वरवरा राव, अरुण फरेरा आणि पत्रकार गौतम नवलाखा यांचा समवावेश आहे. या सर्वांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे. यातील बरेचजण तुरुंगातही आहेत. भारद्वाज वर्षभरापासून तुरूंगातच आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलाकडून पोलिस सुधा भारद्वाज यांच्याविरोधात कोणतेही विश्‍वसनीय पुरावे सादर करू शकले नसल्याचे सांगत युक्तीवाद करण्यात आला होता. भारद्वाज यांच्याकडून उच्च न्यायालयात जामीनअर्ज करण्यात आला आहे.

1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठी वसलेल्या कोरेगाव गावात हिंसाचाराची घटना घडली होती. एक जानेवारी रोजी येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता लाखोंच्या संख्येने हजेरी लावते. वर्षानुवर्षे शांततेत पार पडणार्‍या या सोहळ्याला मागीलवर्षी मात्र काही समाजकंटकांच्या विशुद्ध हेतूमुळे गालबोट लागले होते. या घटनेचा निषेध म्हणून  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे यांच्यावर ही दंगल घडवून आणल्याचा आरोप काही दलित संघटनांनी केला होता. दरम्यान, पुणे पोलिसांनी याप्रकरणी काही डाव्या विचारांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.