Breaking News

जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात भाविकांची मांदियाळी

कर्जत/प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील जगदंबा देवीच्या पालखी उत्सवात भाविकांचा महापूर लोटला होता. नवरात्रापासून वाढत चाललेला भाविकांचा ओघ पालखी उत्सवातही कायम होता. विजयादशमीच्या रात्री बाहेर पडलेल्या पालखीच्या दर्शनासाठी जिल्ह्याबरोबरच राज्याच्या विविध भागातील लाखो भाविकांनी हजेरी लावली.
माहूरची रेणुकामाता व तुळजापूरची तुळजाभवानी या शक्तिपीठांचे ठाणे असलेल्या कुळधरण नगरीत जगदंबा देवीचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साही वातावरणात झाला. आई भवानीचा जयघोष करत विजयादशमीच्या रात्री बारा वाजता देवीची पालखी बाहेर निघाली. हजारो भाविक भक्तांनी मंदिराबाहेरच्या प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी करीत पालखीचे स्वागत केले. पालखीचा कल, छत्री, पूजा आदी मान गावातील जगताप, सुपेकर, गुंड, पवार, आजबे, शिंदे, लहाडे, गजरमल, भवाळ आदी कुटुंबीयांकडे आहेत.त्यानुसार पालखीचा कल, छत्री धरणे, आरती करणे आदींचे नियोजन करण्यात आले होते. या उत्सवात देवीची पालखी गावातील लोकांच्या दारादारात नेण्यात आली. विविध कुटुंबीयांकडून ठीकठिकाणी देवीची आरती करून दर्शन घेण्यात आले. दुपारी बारा वाजता पालखी देवीचे माहेर घर असलेल्या जगताप वाड्यात नेण्यात आली. तेथे विधिवत पूजा करण्यात आली. भाविकांना फळांचे वाटप करण्यात आले.
या पालखी महोत्सवात कुळधरण तसेच पंचक्रोशीतील धालवडी, सुपेकरवाडी, गुंडाचीवाडी, दुरगाव, कोपर्डी आदी गावातील तरुण मंडळांनी सादर केलेल्या लेझीम डावांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सायंकाळी पावणेसहा वाजता पालखी मंदिरात नेण्यात आली.त्यानंतर मानाचे वाटप करण्यात आले. नवरात्र तसेच दसरा उत्सवात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.