Breaking News

‘लिंबू-मिरची लावणारे देशाला काय प्रेरणा देणार’; मोदींचे भाषण व्हायरल

बहुप्रतिक्षित राफेल विमान फ्रान्सने मंगळवारी भारताला सोपवलं. भारतातर्फे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: पहिल्या राफेल विमानाचा ताबा घेतला. मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त असल्याने सिंह यांनी राफेल स्वीकारताना विधिवत शस्त्रपूजन केले. राफेलच्या चाकाखाली दोन लिंब ठेवण्यात आली होती तसेच त्यावर ओम लिहिलेले होते. भारतात दसर्‍याला शस्त्रपूजनाची परंपरा आहे. राफेलचे केलेले शस्त्रपूजन भारतात काही जणांना खटकले आहे. यावरुन आता नवा राजकीय वाद सुरु झाला असून विरोधकांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तर भाजपाने ही भारतीय परंपरा असल्याचे म्हटले आहे. असं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मोदींनी विरोधी पक्षातील एका मुख्यमंत्र्याचे उदाहरण देत लिंबू-मिरची लावणारे देशाला काय प्रेरणा देणार असा सवाल उपस्थित केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2017 रोजी दिल्ली मेट्रोच्या मजेंटा लाइन मार्गिकेचे उद्घाटन केले होते. या उद्घाटन प्रसंगी मोदींने अंधश्रद्धेवरुन विरोधीपक्षाच्या नेत्यांना टोला लगावला होता. ‘जुन्या विचारांमध्ये कैद असलेला कोणताही समाज प्रगती करु शकत नाही. आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. श्रद्धेला नक्की स्थान असावे पण अंधश्रद्धेला थारा देऊ नये. अंधश्रद्धेचा विषय हा केवळ उत्तर प्रदेशमध्ये आहे असं नाही. देशात अनेक राज्य आणि जागा अशा आहेत जिथे परंपरेच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जातात. तुम्ही पाहिलं असेल की एका मुख्यमंत्र्याने गाडी घेतली. त्यावेळी त्यांना गाडीच्या रंगावरुन कोणीतरी काहीतरी सांगितले. त्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांनी गाडीला लिंबू आणि मिरची लावली. ही खरोखर घडलेली आजच्या युगातील गोष्ट आहे,’ असं सांगताना मोदींना हसू आवरता आले नाही. ‘ही अशी लोकं देशाला काय प्रेरणा देणार?’ असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. ‘अशा अंधश्रद्धांमध्ये जगणारे लोकं  सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना समाजाचे मोठे नुकसान करतात. अशा या जुन्या परंपरांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागातील मुख्यमंत्री आणि सरकारे अडकलेली आहेत,’ असा टोलाही मोदींनी या भाषणात लगावला होता.

आता मोदींचा हाच व्हिडिओ फेसबुक, ट्विटवर प्रंचड व्हायरल झाला आहे. अनेकांनी मोदींच्या मताशी सहमती दर्शवत लिंबू मिरची लावणे ही अंधश्रद्धा असून त्याचा धर्माशी संबंध नसल्याचे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी हाच व्हिडिओ वापरुन भाजपावर टीका केली आहे.