Breaking News

शहरात स्वच्छतेचा बोजवारा

अहमदनगर /प्रतिनिधी
शहरात सर्वत्र स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून होत असलेल्या स्वच्छता संदेशाच्या जाहिरातबाजी म्हणजे निव्वळ देखावा ठरत असून भिंतीच्या जाहिरातीलगतच मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या विविध भागात कचर्‍याचे ढीग साचले असून ठिकठिकाणी घाण पाण्याचे डबके साचलेले आहे. मुकुंदनगर परिसरासह शहरातील सर्जेपुरा, रुपवते महाविद्यालय, तोफखाना, बालिकाश्रम रोड, सुडके मळा आदी ठिकाणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणे कचरा साचला जात आहे. यामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणात वाढ होत असून मनपाकडूनही कचरा वेळोवेळी उचलला जात नाही. चिखलमय रस्ता, घाणीच्या दुर्गंधीने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जाण्यास मोठी कसरत करावी लागते. मोठा गाजावाजा करीत स्वच्छतेची मोहीम राबविणार्‍या महापालिकेचे पितळ या भागातील अस्वच्छतेने उघडे पडले आहे. मात्र अजूनही हा कचरा उचलण्यात आलेला नाही. महापालिकेकडूनही या बाबीची दखल घेतली जात नाही.
या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांची भेट घेऊन हा प्रश्‍न सांगितला असता नगरसेवकांनी आचारसंहिता चालू असल्याचे उत्तर देऊन जबाबदारी झटकली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत आहे.