Breaking News

उच्च ध्येयाने यश मिळते: जाधव

पारनेर/प्रतिनिधी

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण जनजीवन आणि त्यांच्यासमोरील समस्यांची जाणीव असल्याने अशा समस्यांचे योग्य पद्धतीने  निरसन करण्याची त्यांच्यामध्ये योग्य क्षमता असते. यामुळे ग्रामीण परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेत उतरणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठे ध्येय, स्वक्षमतेचे आकलन, अभ्यासाचे सातत्य आणि योग्य दिशेचे भान ठेवले तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश निश्चित आहे. असे प्रतिपादन संचित जाधव यांनी केले.

  मुलिकादेवी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्या संचित जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सहदेव आहेर होते.

 संचित जाधव यांची नुकत्याच घोषित झालेल्या यूपीएससीच्या निकालात असिस्टंट कमांडर या रँकसाठी निवड झाली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शालेय शिक्षणापासून शिक्षणाला सुरुवात केलेल्या जाधव यांनी अभियांत्रिकीची पदवी मिळवून उत्तम पगाराची नोकरी आत्मविश्वासाच्या जोरावर नाकारून यूपीएससीचा अभ्यास करून उच्च ध्येय मेहनत व सातत्याच्या जोरावर यश संपादन केले.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा परिक्षा समन्वयक प्रा.आनंद पाटेकर, प्रा अशोक कवडे, प्रा.सोनाली बेलोटे यांनी केले.