Breaking News

पीडीपी नेत्यांना भेटण्यास नकार

श्रीनगर
काश्मीरमधील स्थिती ही पक्षाच्या प्रश्‍नांपेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट करून पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी स्वपक्षीय शिष्टमंडळास भेट देण्यास नकार दिला. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पीडीपीच्या नेत्यांना पक्षप्रमुखांना भेटण्याची परवानगी दिली, मात्र मेहबूबा आणि पक्षनेत्यांची भेट पुढील आठवडयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

मेहबूबा आणि पक्षाचे बहुसंख्य नेते 5 ऑगस्टपासून नजरकैदेत असून तेव्हापासून ते पक्षाच्या कोणत्याही सदस्याला भेटलेले नाहीत. जम्मू-काश्मीर आणि मुंबईच्या आरे वसाहतीमधील स्थिती यांच्यात मेहबूबा यांनी तुलना केली. आरेमधील वृक्ष आणि काश्मिरींचे जीव, असे एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. आरेमधील वृक्षतोड कार्यकर्ते थांबवू शकले त्याचा आनंद आहे, मात्र काश्मिरींना भाषणस्वातंत्र्यापासून का वंचित ठेवले जात आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. मेहबूबा यांनी केवळ आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान मेहबुबा यांना शिष्टमंडळाने भेटण्याबाबत जम्मूतील नेतृत्वाला विश्‍वासात घेतले नाही. पक्षातील काही ‘जमीन माफियांनी’ बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचा आरोप पीडीपीचे सरचिटणीस व माजी आमदार सुरिंदर चौधरी यांनी केला.