Breaking News

दहशतवाद संपवा अन्यथा कारवाईला तयार राहा, ‘एफएटीएफ’चा पाकिस्तानला अल्टिमेटम

दिल्ली
आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) पाकिस्तानला दहशतवाद संपवण्यासाठी अ‍ॅक्शन प्लानची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. यासाठी एफएटीएफने पाकिस्तानला फेब्रुवारी 2020 पर्यंतची मुदत दिली आहे. निर्धारित वेळेत कारवाई करण्यात अपयशी ठरल्यास पाकिस्तानने कारवाईसाठी तयार राहिलं पाहिजे. तसंच पाकिस्तानसोबत होणार्‍या कोणत्याही आर्थिक देवाण-घेवाण आणि व्यवसायांवर नजर ठेवली जावी असंही एफएटीएफने म्हटलं आहे.
जून 2018 मध्ये करड्या यादीत समावेश
एफएटीएफने 2018 मध्ये पाकिस्तानला करड्या यादीत टाकलं होतं. अ‍ॅक्शन प्लानमध्ये सुचवण्यात आलेल्या 27 पैकी 22 शिफारशींची अंमलबजावणी करण्यात पाकिस्तान अपयशी ठरलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानला अ‍ॅक्शन प्लानची अंमलबजावणी करण्यासाठी एका वर्षाची वेळ दिली होती. यामध्ये मनी लॉण्ड्रिंग आणि दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत रोखण्यासाठी पर्याय सुचवण्यात आले होते.
अ‍ॅक्शन प्लॅन फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण करावा असं पाकिस्तानला बजावत आहोत. फेब्रुवारी 2020 पर्यंत अ‍ॅक्शन प्लॅन पूर्ण न झाल्यास एफएटीएफकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा नव्याने जारी करण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. इशारा देताना एफएटीएफने यामध्ये इतर सदस्य देशांना पाकिस्तानसोबत करण्यात येणार्‍या आर्थिक व्यवहार, तसंच व्यवसायिक संबंध आणि देवाण-घेवाण यावर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
एफएटीएफकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानवर प्रचंड दबाव आहे. कारण एफएटीएफ पाकिस्तानला करड्या यादीतून वगळायचं की इराण आणि दक्षिण कोरियासोबत काळ्या यादीत टाकायचं यासंबंधी निर्णय घेणार होता.  एफएटीएफने यासंबंधी निर्णय जाहीर केला असून तूर्तास पाकिस्तानला दिलासा मिळाला आहे.
दहशतवादावर लक्ष ठेवण्यासाठी एफएटीएफची निर्मिती
एफएटीएफ पॅरिसमधील आंतर-सरकारी संस्था आहे. या संस्थेचं काम बेकायदेशीर आर्थिक मदत रोखण्यासाठी नियम बनवणं आहे. 1989 मध्ये या संस्थेची निर्मिती करण्यात आली. एफएटीएफच्या करड्या किंवा काळ्या यादीत नाव गेल्यास संबंधित देशाला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज मिळण्यात अनेक अडचणी निर्माण होतात.