Breaking News

ठाणे स्थानकात प्रवासी कोंडी?

ठाणे
 ठाणे रेल्वे स्थानकातील पूर्व आणि पश्‍चिमेला जोडणारे दोन पादचारी पूल धोकादायक झाल्याने ते पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, हे दोन्ही पूल बंद झाल्यानंतर ठाणे स्थानकातील प्रवाशांचा भार उर्वरित पादचारी पुलांवर वाढणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सात लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. स्थानकात रेल्वे प्रवाशांसाठी पाच पादचारी पूल आहेत. तर शहराला पूर्व आणि पश्‍चिेमला जोडण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंबई आणि कल्याण दिशेकडे दोन पादचारी पूल उभारले आहेत. मात्र, सुमारे 44 वर्षे जुने झालेले हे पूल धोकादायक झाल्याचा अहवाल आयआयटीने दिल्याने ते पूल पाडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भात लवकरच रेल्वेच्या विविध विभागांतील अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहेत. हे पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे समजते.
कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेला असणार्‍या एका पादचारी पुलाचे काम नऊ महिन्यांपासून रखडले आहे. त्यातच महापालिकेचे दोन पूल बंद झाल्यावर उर्वरित पुलांवर मोठी गर्दी होणार आहे. ‘स्थानकातील कल्याण दिशेकडे असलेल्या पादचारी पुलाचे काम रखडले असल्याने प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे. त्यातच हे दोन पूल बंद झाल्याने इतर पुलांवर गर्दी वाढणार असून रेल्वेने इतर या तीनही पुलांची कामे युद्धपातळीवर करायला हवीत,’ असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.