Breaking News

वंचित बहुजन आघाडीचा वचननामा प्रकाशित

अहमदनगर/प्रतिनिधी
 शहर विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत वचननामा प्रकाशित केला. काळे यांनी आपला 21 कलमी वचननामा प्रकाशित करताना आपण शहरासाठी काय करणार? आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून काय करणार नसल्याचा या वचननाम्यात समावेश आहे. या आगळ्या-वेगळ्या वचननाम्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
वंचित बहुजन आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवार काळे यांच्यासह भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, दिलीप साळवे, विनोद गायकवाड, हनीफ शेख आदी उपस्थित होते. नगर शहराला औद्योगिक शहर उद्योग नगरी म्हणून निर्माण करणार. हा विषय घेत काळे यांनी शहरातील एमआयडीसीचे प्रश्‍न तरूणांच्या हाताला रोजगार, राजकारण्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करणे, दर्जेदार रस्त्यांची निर्मिती, उड्डाणपुलाचे काम पूर्ण करणे, दिल्लीच्या धर्तीवर मोहल्ला क्लिनिकची उभारणी करणे, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे यांचा प्रामुख्याने समावेश वचननाम्यात करण्यात आला आहे.
नेहरू मार्केट, शरण मार्केट आणि यासारख्या अनेक मार्केटमध्ये गाळेधारकांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे गाळे उपलब्ध करून देणे, संगीत, कला, नाट्य, चित्रपट, साहित्य आदी क्षेत्रातील लोकांसाठी नाट्यगृहाची उभारणी करणे, व्यापार्‍यांना जाचक ठरणार्‍या जीएसटी कायद्याच्या विरोधात शासनावर दबाव आणणे, उद्योजक, लघू उद्योजक, इंजिनियर्स, डॉक्टर, आर्किटेक्ट आदींचे प्रश्‍न सोडवणे, प्रवासी आणि कार्गो विमानतळाची उभारणी करणे, कचरामुक्त शहर करीत स्वच्छ आणि सुंदर शहराची निर्मिती करणे, महिला सक्षमीकरणासाठी काम करणे अशा अनेक विषयांचा देखील समावेश वचननाम्यात करुन मतदारांना आश्‍वासन देण्यात आले आहे.
तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला, नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, कोणाची हत्या अथवा कटकारस्थान करणे, व्यापार्‍यांना धमकावणे, तरुणांना गुन्हेगारी विश्‍वात लोटणे, कष्टाची प्रॉपर्टी बळकाविणे, भ्रष्टाचार करणे, नागरिकांवर अन्याय व शोषण, जातीय दंगली, कुठल्याही कामात टक्केवारी खाणे, भावनिक राजकारण करणे,  धर्माच्या नावाखाली राजकीय पोळी भाजणे, सेटलमेंटचे राजकारण, सत्ता लालसेपोटी मनपा निवडणुकीत अभद्र युती, भयमुक्त नगरचा खोटा नारा देणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माध्यमातून कामगारांचे शोषण, एमआयडीसीतील उद्योजकांना खंडणी, उद्योजकांना मारहाण करून शहरातून कंपन्यांना पळवून लावणार नाही, पत्रकारांना मारहाण, मनपा अधिकार्‍यांना चप्पल फेकून मारणे, आदी गोष्टी आपण करणार नसल्याचे किरण काळे यांनी जाहीर केले आहे.