Breaking News

कार्टोसॅट-3 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी

अमेरिकेचे 13 व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात झेपावले

पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी व नकाशा निर्मितीसाठी होणार फायदा

Rocket
श्रीहरिकोटा
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी आपल्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 1625 किलो वजनाच्या कार्टोसॅट-3 उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहासह अमेरिकेतील 13 व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी, तसेच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-3’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
‘कार्टोसॅट-3’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. कार्टोसॅट-3 उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. 13 लघु उपग्रहांमध्ये ‘फ्लोक-4 पी’ हे 12 लघु उपग्रह असून, एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे. या खास क्षणी इस्त्रोचे प्रमुख के सिवन यावेळी श्रीहरीकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते. पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी 47 आणखी 13 व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे 74 वे उड्डाण आहे. हा कार्टोसॅट श्रृंखलेतील नववा उपग्रह आहे. श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातील दुसर्‍या लाँच पॅडमधून याचे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसलव्ही-सी47 मोहिमेच्या ’काऊंटडाऊन’ला मंगळवारी सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथे सुरुवात झाली. पीएसएलव्ही-सी 47 हा उपग्रहवाहक आपल्या 49 व्या मोहिमेअंतर्गत 13 नॅनो उपग्रहांसह कार्टोसॅट-3 अवकाशात सोडण्यात आले. कार्टोसॅट-3 चे वजन 1 हजार 625 किलो असून ते शहरी नियोजन, ग्रामीण साधने आणि पायाभूत विकास, किनार्‍यावरील जमिनीचा वापर याबाबत वाढत्या मागण्या पूर्ण करणार आहे.


‘कार्टोसॅट-3’ भारताचा डोळा
या उपग्रहांच्या मदतीने मॅपिंग करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे. ‘कार्टोसॅट-3’हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. 509 किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी 47 प्रक्षेपकाचे हे 21 वे उड्डाण आहे.