Breaking News

पालिकेच्या 61 मंडयांतील हरित कचर्‍यापासून खतनिर्मिती

Mandai
मुंबई
दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईसह चार मंडयांमधील हरित कचर्‍यापासून खत निर्मितीची योजना यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने मुंबईतील 61 मंडयांमधील कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मंडयांत दररोज गोळा  होणार्‍या 42 मेट्रीक टन कचर्‍याची तेथेच विल्हेवाट लागेल, असा पालिकेचा दावा आहे.
मुंबईकरांचा कचरा सामावून घेणार्‍या देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीतील कचरा साठवणुकीची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे दर दिवशी मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा कचरा पालिकेसाठी डोकेदुखी बनला आहे. यावर तोडगा म्हणून मुंबईतील 20 हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या, तसेच दर दिवशी 100 किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या सोसायट्यांना कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याचे बंधन पालिकेने घातले आहे. सोसायट्या, मॉल्स आणि हॉटेल्सवर बंधन घालणार्‍या पालिकेने आपल्या मंडयांमध्येही हरित कचर्‍यापासून खतनिर्मितीसाठी योजना आखली होती. मात्र कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात पालिका अपयशी ठरत होती. बरेच प्रयत्न केल्यानंतर दादरमधील क्रांतिसिह नाना पाटील मंडई आणि माँसाहेब फूलबाजारासह चार मंडयांमध्ये हरित कचर्‍यापासून खतनिर्मितीचा श्रीगणेशा करण्यात पालिकेला यश आले. आता पालिकेने तब्बल 61 मंडयांमधील हरित कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर 65 मंडयांमध्ये दररोज निर्माण होणार्‍या 42 मेट्रिक टन कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यात येईल, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
मुंबईमध्ये पालिकेच्या एकूण 91 मंडया असून तेथे निर्माण होणारा कचरा कचराभूमींमध्ये पाठविण्यात येत आहे. त्यापैकी चार मंडयांमध्ये यापूर्वीच खतनिर्मिती करण्यात येत असून 61 मंडयांमध्ये लवकरच ती सुरू होणार आहे. त्यामुळे कचराभूमीवरील कचर्‍याचा भार हलका होऊ शकेल, असा विश्‍वास या अधिकार्‍याने व्यक्त केला.

मंडयांमधील हरित कचर्‍याची तेथेच विल्हेवाट लावण्यात येणार आहे. त्यासाठी 61 मंडयांची निवड करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करुन  लवकरच ही योजना राबविण्यात येईल.
- प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, बाजार विभाग