Breaking News

एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?

Eknath Khadase
मुंबई
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने सातत्याने डावलल्यामुळे खडसे काहीसे नाराज असून, पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणांत सक्रीय होण्यास उत्सुक आहेत. मात्र भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना प्रवेश करण्यास खडसे उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेला आणखी ताकद मिळणार आहे.
एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात असून, लवकरच महाआघाडीच्या सरकारमध्ये प्रवेश करून मंत्रिपद मिळवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपचे सरकार कोसळल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. सिंचन घोटाळयाचे गाडीभर पुरावे, आम्ही रद्दीत विकल्याची उपहासात्मक टीका खडसे यांनी केली होती.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकिटे कापल्याने त्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळेच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचे खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले होते. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर 25 जागा वाढल्या असत्या, असे म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. एकनाथ खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात आहेत, असे शरद पवारांनी त्यावेळी म्हटले होते. भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले एकनाथ खडसे खरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? अशी चर्चा तेव्हा रंगली होती. एकनाथ खडसे यांना भाजपाकडून तिकीट नाकारण्यात आले होते, तसेच त्यांच्या कन्येला मुक्ताईनगरमधून तिकीट दिल्यानंतरही राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटलांनी तिचा पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपामध्ये नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येत होत्या. दरम्यान, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे विचारल्यानंतर त्यांनीही ते वृत्त फेटाळून लावले होते. पक्षाच्या आदेशाने मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. गेले 30 वर्षे तुम्ही मला निवडून देता. मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही खडसे म्हणाले होते. तसेच राष्ट्रवादी सोबत तीन महिनेच काय तर तीन वर्षांपासून संपर्कात राहिलेलो नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे त्यावेळी दिले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत की शिवसेनेत कोणत्या पक्षात जाणार?, या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आले आहे.