Breaking News

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा गेम ऑफ पेशन्स!

मुंबई
राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप अनुकूल नसला, तरी भाजप शिवसेनेला कोंडित पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेत शिवसेनेला सत्त स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपने विरोधी बाकांवर बसण्याचा संयमी निर्णय घेतला आहे. आता सत्तास्थापनेचा चेंडू शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कोर्टात. पण मग आता भाजप हातावर हात ठेवून सत्ता स्थापनेचा खेळ बघत बसणार का? या प्रश्‍नाचं उत्तर आहे ‘मुळीच नाही !’
निकालानंतर सलग सतरा दिवस भाजपने संयम ठेवत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याचा ‘प्लॅन ए’ फसल्यानंतर भाजप आता ‘प्लॅन बी’ च्या तयारीला लागली आहे. त्यासाठीच भाजप कोअर कमिटीची बैठक आज ‘वर्षा’वर संपन्न झाली. या बैठकीत विरोधी बाकावर बसत असतांना, शिवसेनेची कशी कोंडी करायची, यासाठी रणनिती ठरविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. भाजपला शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणं जितकं अवघड आहे तितकंच सेनेला भाजपशिवाय. कारण सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार याची भाजपला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे सर्वप्रथम शिवसेनेला वैचारिक आणि तात्विक मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी राम मंदिर, हिंदुत्व, वीर सावरकर ते अगदी महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत या पक्षात असलेल्या वैचारिक मतभेदांवर मीम्स आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यास ट्रोल आर्मी सक्रिय होताना दिसेल. दुसरे म्हणजे भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत वरिष्ठ पातळीवर संपर्क करुन सेनेसोबतच्या अनैसर्गिक युतीचे दुष्परिणाम काय असतील याबाबत संकेत दिले जातील. ज्यामुळे राज्यात सत्तेचा वाटा मिळत असला तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तपास यंत्रणांचा वापर दबाव तंत्रासाठी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा रीतीने सेनेचे पर्यायाचे दोर कापण्याचे भाजपकडून शर्तीचे प्रयत्न होऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप खेळणार ‘गेम ऑफ पेशन्स’. शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ न मिळाल्यास सत्ता स्थापनेचा दावा करण्यास सेना ही असमर्थ ठरेल. त्यानंतर किमान महिनाभर भाजप काळजीवाहू सरकार चालवू शकेल. या काळात निवडून आलेल्या एकाही लोकप्रतिनिधीला आमदारकीची शपथ घेता येणार नाही. त्यामुळे निवडणुकीत जिंकूनही अनेकांना सर्वसामान्य म्हणूनच राहावं लागेल. यापैकी अनेक जण विशेषतः शिवसेनेतील आमदारांनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. त्यांच्यावर पैसे लावणार्‍या फायनान्सरचा या आमदारांच्या मागे सत्तेत जाण्यासाठी प्रचंड तगादा असल्याच म्हटलं जातं आहे. यापैकी अनेकांची पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्या तर पैसे खर्च करण्याची ऐपत नाही आणि पुन्हा निवडून येण्याची शाश्‍वतीही नाही. त्यामुळे या आमदारांना फार काळ एकसंध ठेवणं शिवसेनेसह इतर पक्षांसमोर मोठं आव्हान आहे. अशा स्थितीत राष्ट्रपती राजवट लागली तर त्याचा सर्वात जास्त फायदा भाजप आणि नुकसान इतर पक्षांना होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे भाजपचा अंत पाहणार्‍या सेनेला वठणीवर आणण्यासाठी भाजपकडून साम, दाम नंतर आता दंड आणि भेदचा वापर करावा लागणार आहे.


भाजप मुंबई महापालिकेतील पाठिंबा काढणार
लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावे, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेने अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्‍वभूमीवर भाजपने सेनेला कोंडित पकडण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेतला पाठिंबा भाजप काढून घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपने कोअर कमिटीच्या बैठकीत याबद्दल चर्चा केली असून, लवकरच भाजप मुंबई महापालिकेतील पाठिंबा काढून घेणार आहेत. या बैठकीत सेनेला कोणत्याही परिस्थितीत कोंडित कसे पकडायचे याबद्दल रणनिती ठरवण्यत आली आहे.