Breaking News

महाविकासाचा ‘उध्दव’पर्वारंभ

महाराष्ट्रात तब्बल एक महिना सुरु असलेला राजकीय धुडगूस अखेर संपला असं आता म्हणता येईल. अहंकार आणि अतिलालसेपोटी सत्ता स्थापनेचा खेळखंडोबा केला गेल्याने निर्माण झालेली राजकीय अस्थिरता अखेर संपुष्टात आली. गुरुवारपासून महाविकासाचा उध्दवपर्वारंभ होत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सायंकाळी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचं नव सरकार सत्तेत येत असून बुधवारी आघाडीतील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविध सोहळा पार पडला. सत्तासंघर्षाची बिकट वाट पूर्ण करीत अखेर शिवसेना सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. शिवसैनिक असलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले सदस्य मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘पॉवरबाज’ खेळीमुळेच अखेर शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती करणं शक्य झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे जहाल वक्तृत्व, बेधडक व्यक्तिमत्त्व. त्याउलट उद्धव हे शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. सायलेंट किलर म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोणत्याही कटू प्रसंगात ते आपले संतुलन ढळू देत नाहीत आणि आक्रस्ताळेपणाही करत नाहीत. मात्र, अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार्‍यांना ते योग्यवेळी शांतपणे जागा दाखवून देतात. आपल्या नेतृत्वावर आक्षेप घेणार्‍या मनोहर जोशी यांच्यासारख्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी सक्तीने राजकारणातून निवृत्ती घ्यायला लावली. नव्वदच्या दशकात उध्दव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला. 1985 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर ताबा मिळवला. या निवडणुकीपासून त्यांनी शिवसेनेच्या निवडणूक धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. तो काळ शिवसेनेच्या एका वेगळ्या युवा नेतृत्वानं भारावून टाकणारा होता. त्या काळात आणखी एका ठाकरेंचाच महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला होता. ते होत राज ठाकरे. सन 1997 आणि 2002 सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला यश मिळालं.
सन 2003 साली महाबळेश्‍वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं. त्यात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरला. त्यातूनच राज ठाकरेंच्या मनातली धुसफूस वाढली. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांना विरोध करण्याच्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्या मी मुंबईकर या सर्वसमावेशक चळवळीचा बळी गेला. पुढेे राज ठाकरेंचं बंड होण्याआधी शिवसेनेत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिलं. त्यामुळे राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. नारायण राणे यांच्या नंतर सन 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन वेगळी वाट धरली. उद्धव ठाकरे स्वभावानं शांत आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व हे संयमी आहे. त्याउलट त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे हे आक्रमक स्वभावाचे आणि बाण्यानं पक्के शिवसैनिक आहेत. त्यात बाळासाहेबांच्या घणाघाती वक्तृत्वशैलीची छापही राज ठाकरे यांच्यामध्ये आढळते. त्याच राज ठाकरे आणि नारायण राणे या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडल्यानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासमोरची आव्हानं आणखी वाढली. महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी आणि आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप कष्ट घ्यावे लागले. सन 2012 हे वर्ष उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातलं सर्वात जास्त संघर्षाचं ठरलं. 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा आधार गेला. ते एकटे पडले. त्यांना राजकीय संघर्षाबरोबरच घरगुती संघर्षालाही सामोरं जावं लागलं. पण इथंच उद्धव ठाकरेंचा शांत आणि संयमी स्वभाव त्यांच्या कामी आला. त्याच गुणांनी त्यांना दोन्ही आघाड्यांवरच्या संघर्षातून तारुन नेलं. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुरु केलेला संघर्ष उद्धव ठाकरेंनी पुढे सुरु ठेवला. दोन वर्षांत देशात लोकसभा निवडणुका झाल्या. शिवसेनेनं पारंपरिक मित्र भाजपच्या साथीनं लोकसभेत चांगलं यश मिळवलं. पण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपनं सेनेची साथ सोडली. केंद्रात बहुमतात असलेल्या भाजपला शिवसेनेनं आव्हान दिलं. दोन्ही काँग्रेसचा पराभव जवळपास निश्‍चित असताना शिवसेना भाजपसमोर टिकेल का, असा सवाल विचारला जाऊ लागला. पण मोदी, शाह आणि फडणवीसांच्या झंझावातासमोर उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पाय रोवून उभे राहिले.
त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं एकट्यानं लढून विधानसभेत तब्बल 63 जागांवर विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांनी त्यानंतरही आपला मुरब्बीपणा दाखवला. हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी काही महिन्यांतच शिवसेनेला भाजपसोबत सत्तेवर बसवलं. पण सत्तेत बसूनही त्यांनी विरोधकांची स्पेस काबीज करुन सरकारला धारेवर धरलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला वाद इतका टोकाला गेला की उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलं. पण उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचा गड आपल्याकडेच कायम राखला. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली परिपक्वता आणखी दिसून आली. त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना मातोश्रीची वारी करायला लावली. त्यानंतरच त्यांनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं. शिवसेना-भाजपची युती विधानसभा निवडणुकीत सुध्दा कायम राहावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी जागांची तडजोड मान्य केली. त्यावेळी एक पाऊल मागं घेताना त्यांनी दुसरं पाऊल नेटानं पुढे टाकलं. ‘मातोश्री’तल्या ठाकरेंनी निवडणूक न लढवण्याच्या परंपरेला त्यांनी पहिल्यांदा छेद दिला. उद्धव ठाकरेंचे थोरले चिरंजीव आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वरळी मतदारसंघातून त्यानी मोठा विजय सुध्दा मिळवला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानं महाराष्ट्राचं राजकीय चित्र पुन्हा बदललं. आणि निमित्त ठरलं जागाचं गणित आणि नवी राजकीय समीकरणं लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका. लोकसभेच्या निवडणुकीआधी ठरलेल्या 50-50च्या फॉर्म्युल्यानुसार आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्या, ही भूमिका उद्धव ठाकरें सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम ठेवली.  या राजकीय लढाईची सारी सूत्रं आपला वजीर संजय राऊत यांच्या हाती सोपवून उद्धव ठाकरेंनी भाजपला आणखी डिवचण्याची संधी सोडली नाही. अखेर शिवसेना-भाजप युती कायमची तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेनं एक पाउल पुढे टाकत राष्ट्रवादी व काँग्रेसशी हातमिळवणी केली. आघाडीचं हे सरकार सत्तेत येणार असं वाटत असतानाच अजित पवार यांनी बंड केलं.  शरद पवार मात्र महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यामुळे अजित पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होत असून महाराष्ट्रात विकासाचं नवं पर्व सुरु होतयं असं म्हणायला काहीच हरकत नाही. नव्या सरकारला यासाठी शुभेच्छा!