Breaking News

मुत्सद्दी नेतृत्वामुळेच पुन्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता

Arti
अहमदनगर/प्रतिनिधी
“विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्री विशाल गणेशास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस व्हावेत, असे साकडे घालण्यात आले होते; आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे केलेला नवस पूर्ण झाला आहे. श्री विशाल गणेशाची आरती करुन तो नवस फेडत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे राज्यातील जनतेने भाजपाला जनादेश दिला; परंतु मित्रपक्षाच्या आडमुठ्या धोरणामुळे सत्ता स्थापनेस विलंब होत होता, परंतु भाजपाच्या मुसद्दी नेतृत्वामुळे पुन्हा महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी केले.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नगर येथे भाजपाच्या वतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी प्रा.मधुसूदन मुळे, भाजप प्रदेश कार्य. सदस्य अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, जगन्नाथ निंबाळकर, मिलिंद गंधे, धनंजय जामगावकर, दामोदर बठेजा, प्रकाश सैंदर,  सचिन पारखी, नितीन उदमले, महेश नामदे, मुकूल गंधे, दत्ता गाडळकर, अनिल गट्टाणी, अंकुश गोळे, मयूर बोचूघोळ, बाबा सानप, गणेश औसरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अभय आगरकर म्हणाले,“जनादेश असताना सत्ता स्थापनेचे भिजत घोंगडे पडले होते.  महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचे सरकार येणे गरजेचे होते. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांमुळे लोकांना भाजपाचे सर्वात जास्त उमेदवार निवडून दिले होते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येत ही सत्ता स्थापन केली आहे. या अनुभवी नेत्यांच्या दुरदृष्टीने महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल, यात शंका नाही.’’
यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने श्री विशाल गणेशाची आरती करुन पेढे वाटण्यात आले. त्याचबरोबर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी सोमनाथ चिंतामणी, शाकीर सय्यद, विलास नंदी, भाऊ पानमळकर, महावीर कांकरिया, प्रकाश सोनी, शरद मुर्तडकर, विनोद भिंगारे, मनीष लोढा, पंडित वाघमारे, बाळासाहेब पाटोळे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.