Breaking News

गर्भवती पत्नीला नवर्‍याने रेल्वेतून दिले ढकलून

मुंबई
रेल्वे प्रवासात झालेल्या भांडणामुळे पतीने पत्नीला रेल्वेतून ढकलून देण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष ही स्त्री गर्भवती होती. पश्‍चिम रेल्वेच्या दहिसर आणि मीरा रोड स्थानकांच्या दरम्यान हा प्रकार घडला. सागर धोडी (25) असे या तरुणाचे नाव आहे. त्याची दुसरी पत्नी राणी हिच्याशी त्याचे रेल्वे प्रवासात भांडण झाले आणि त्याने तिला चक्क रेल्वेबाहेर ढकलून दिले. रेल्वेची गती धीमी असल्यामुळे  राणीने स्वत:चा जीव कसाबसा वाचवला. राणीने सांगितलं की ती सहा महिन्यांची गर्भवती आहे आणि तिचा पती सागरला हे मूल नको. याच कारणावरून त्यांच्यात गेल्या काही काळापासून सतत वाद होत होते. ट्रेनमध्ये हा जीवघेणा प्रकार घडल्यानंतर सागर तिथून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. ते सर्व बोरिवलीला रावळपाडा येथे राहत होते. त्यानंतर त्याचे राणीवर प्रेम जडले. सागर आणि राणीबद्दल कळताच सागरच्या पहिल्या पत्नीने मुलांना सोबत घेऊन घर सोडलं. सागरने राणीशी 1 नोव्हेंबरला लग्न केले. लग्नाच्या वेळी राणी सहा महिन्यांची गर्भार होती. त्यांनी लग्न केले असले तर सागरला ते मूल मात्र नकोय. या सगळ्याला कंटाळून राणीने तिचे माहेरचे घर सोडले. सागर तिला 15 नोव्हेंबरला भेटायला गेला आणि तिला त्याच्यासोबत नालासोपारा येथील मित्राकडे येण्यास सांगितले. ती तयार झाली आणि त्यांनी बोरिवलीहून विरार ट्रेन पकडली. ’राणी म्हणाली की ते ट्रेनमध्ये जनरल डब्यात दाराजवळ उभे होते आणि ट्रेनमध्ये चढल्याचढल्याच त्यांनी भांडायला सुरूवात केली होती,’ असं एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. ट्रेनने दहिसर ओलांडले. तेव्हा सागरने तिला छातीवर एक ठोसा लगावला आणि नंतर ट्रेनमधून ढकलले. राणी ट्रॅकवर पडली. तिच्या पायांना, उजव्या हाताला आणि डाव्या डोळ्याला जखम झाली आहे. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे बाळ सुखरुप आहे. ती आता तिच्या आईसोबत राहात आहे.