Breaking News

देशाच्या विकासात आरोग्य व शिक्षणाची भूमिका महत्त्वाची

अहमदनगर/प्रतिनिधी 
 “आरोग्य व शिक्षण देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून या दोन्ही गोष्टींशिवाय देश विकास करु शकत नाही. बदलत्या काळानुरुप शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान, कौशल्याचे आत्मसात करण्याची गरज आहे’’, असे प्रतिपादन जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी व्यक्त केली.
येथील रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने महापालिकेसह शहरातील शालेय शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी काठमोरे बोलत होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष दादासाहेब करंजुले, रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सचिव नंदिनी जग्गी, प्रकल्प प्रमूख डॉ.बिंदू शिरसाठ, सुशीला मोडक, प्रतिभा धूत, सुरेखा मनियार, शीलू मक्कर आदींसह रोटरीचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी काठमोरे पुढे म्हणाले, “मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्धिकतेबरोबर भावनिक बुद्धीमत्तेला देखील महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये हे गुण फक्त शिक्षकच विकसित करु शकतात. अशा प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून ज्ञानाला चालना मिळत असल्याचे सांगून रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक केले.
भुईकोट किल्लाजवळील पंडित नेहरु हिंदी माध्यमिक विद्यालयात रोटरीच्या टीच उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. किशोर मुनोत यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ झाला होता. या प्रशिक्षण कार्यशाळेत शिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त नवनवीन शिक्षण पद्धतीवर प्रवीण पारधे, प्राचार्या स्वाती मुनोत, डॉ.प्रसाद उबाळे, बबीता जग्गी, जयंत ओहोळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेत उत्कृष्ट शिक्षक म्हणून उन्मेश शिंदे (भिंगार हायस्कूल) व रुपाली काळे (आठरे पाटील पब्लिक स्कूल) यांना गौरविण्यात आले. बेस्ट ग्रुपचे प्रथम बक्षीस आठरे पाटील पब्लिक स्कूल, द्वितीय भिंगार हायस्कूल तर तृतीय पंचशील विद्या मंदिर यांना देण्यात आले. पाहुण्यांचा परिचय शेखर उंडे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन शीलू मक्कर यांनी केले. आभार नंदिनी जग्गी यांनी मानले.