Breaking News

महापौरांच्या प्रभागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

अहमदनगर/प्रतिनिधी
प्रभाग क्र.1 मधील सिद्धीविनायक कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, एका श्‍वानास मागील काही महिन्यांपासून त्वचेचा विकार व जखमा झाल्या आहेत. या श्‍वानामुळे आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर येऊन नागरिकांनी त्याचा धसका घेतला आहे. महापौरांच्या प्रभागातील हा प्रश्‍न त्यांना सांगून देखील उपाय योजना होत नसल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सिद्धीविनायक कॉलनीत एका श्‍वानाला काही महिन्यांपासून त्वचेचा विकार होऊन जखमा झाल्या आहेत. या श्‍वानामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. तो या घरातून त्या घरापुढे वारंवार बसत असताना, या श्‍वानाचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे केली होती. मात्र महापालिकेकडून याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. श्‍वानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.