Breaking News

स्टॅच्यू ऑफ युनिटी ठरलं देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक

Staue_of_Unity
नवी दिल्ली
गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक ठरलं आहे. एका वर्षात 24 लाख पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली असून 63 कोटी रुपयांची कमाई या स्मारकाने केली आहे. ताजमहालला भेट देणार्‍या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कमाई केवळ 56 कोटी रुपये असून कमाई करणार्‍या स्मारक पर्यटन स्थळांमध्ये ताजमहाल दुसर्‍या स्थानी आहे.

दरम्यान सर्वाधिक पर्यटक हे ताजमहालला भेट देत असले तरी कमाई मात्र स्टॅच्यू ऑफ युनिट स्मारकाची होत आहे. जगातील सर्वाधिक उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी स्मारकाला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2018 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचं उद्घाटन झालं होतं.

भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्याने कमाईच्या बाबतीत देशातील श्रेष्ठ 5 स्मारकांमध्ये बाजी मारली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याची उंची 182 मीटर आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 2989 रुपये खर्च करण्यात आले होते. लार्सन अँड टुब्रो कंपनीने हा पुतळा बनवला होता. सरदार सरोवर धरणापासून 3.2 किलोमीटरवर साधू बेटावर हा पुतळा बनवण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 3 हजार हून अधिक मजूर आणि 250 हून अधिक इंजिनियर्स झटत होते.

स्टॅच्यू ऑफ युनिटीनंतर ताजमहल, आग्र्याचा किल्ला, कुतुब मिनार, फतेहपूर सीकरी आणि दिल्लीचा लाल किल्ला यांचा नंबर लागतो. मागच्या वर्षी ताजमहलने 56.83 कोटींची कमाई केली होती.