Breaking News

अहंकारी भाजपला मोठी किंमत मोजावी लागणार

अहमदनगर/प्रतिनिधी
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करुन महाराष्ट्राचा लढवय्या इतिहास देशाला, जगाला दाखवून दिला आहे. याच महाराष्ट्राने अहंकारी दिल्लीवाल्या भाजपचा अहंकार उतरविला. महाराष्ट्र राज्य कोणासमोरही झुकणार नाही. भाजपवाल्यांनी  शिवसेनेचे बोट धरुन महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढविला आणि आम्हाला संपवायला निघाले. भाजपाने शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान दुखावला आहे, त्यामुळे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल’’, असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी दिला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून जल्लोष करत नागरिकांना पेढे वाटण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे, नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, शिवाजी कदम, प्रशांत गायकवाड, अनिल लोखंडे, हभप भाकरे महाराज, संजय सागांवकर, बाली शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 पंधाडे पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये हिर्‍यांची निर्मिती होते. महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला खूप मोठे नेते दिले, पण नेहमीच दिल्लीवाल्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रगतशील राज्य आहे. या राज्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या महाराष्ट्रावर कोणीही अन्याय करु नये. महाराष्ट्र हे स्वाभिमानी राज्य असून कधीही कोणासमोर झुकणार नाही’’, असे त्यांनी शेवटी सांगितले.