Breaking News

दोस्त बन गये दुश्मन

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेच आहे. मात्र, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यामदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, चार दिवसांतच हे सरकार कोसळलं, यामागे अजित पवारांची खेळी होती असे सिध्द झाले. मात्र, अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्‍वासच का ठेवला? असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे. या सवालाला भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सावरासावरीचे उत्तर दिले असले तरी आधी लोकसभा निवडणुका आणि नंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही शरद पवार, अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आता एकाच पंगतीत बसले आहेत व युती होवून ठरल्याप्रमाणे शिवसेनेचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत दुश्मनाला जवळ घेतल्याने मान खाली घालायची पाळी आलेल्या भाजपाचे त्यामुळे  बारा वाजलेत.अश्या पध्दतीने आजके दोस्त कलके दुश्मन ही उक्ती सध्या लागु पडत आहे.
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेच आहे. मात्र, हे सरकार स्थापन होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यामदतीने सरकार स्थापन केलं होतं. मात्र, चार दिवसांतच हे सरकार कोसळलं, यामागे अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हे प्रमुख कारण होतं. मात्र, अजित पवारांवर पक्ष नेतृत्वाने विश्‍वासच का ठेवला? असा सवाल आता भाजपामधूनच विचारला जात आहे. या सवालाला भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सावरासावरीचे उत्तर दिले असले तरी आधी लोकसभा निवडणुका आणि नंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही शरद पवार, अजित पवार आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. विरोधक शिल्लकच राहिले नाहीत, या अविर्भावात संपूर्ण प्रचार रेटला. मात्र निवडणूक निकालात असे निकाल लागले  की, त्यामुळे एकत्र निवडणूक लढविणार्‍या शिवसेना-भाजप यांच्यातच सत्तेसाठी फूट पडली. ज्या पवार कुटुंबियांवर युतीच्या नेत्यांनी टीका केली, आज त्यातील भाजपला अजित पवारांच्या तर शिवसेनेला खुद्द शरद पवार यांच्याच आधाराची गरज भासली आहे. पवार कुटुंबियांच्या मदतीशिवाय भाजपची किंवा शिवसेनेची सत्ता राज्यात येऊ शकत नाही.मतदारांनी प्रबळ व प्रस्तापित पक्षांची अस्थीरतेत ढकलूल गोची केली . राज्यातील शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी आजवर धर्मनिरपेक्षता, हिंदुत्व, फुले-आंबेडकर, भूमिपुत्र या सर्व मुद्यांवर जे काही संधिसाधू राजकारण केले होते ते सर्व खुंटीला टांगून ठेवले. संपूर्ण हयात एकमेकांना अस्थिर करण्यात घालविणारे हे सर्व राजकीय पक्ष आता अचानक राज्याला स्थिर सरकार देणे गरजेचे आहे, या उदात्त हेतूने नवनव्या जोड्या जुळवत आहेत. विधानसभा निवडणूक लढवताना शिवसेना-भाजप यांनी युती करून तर काँग्रेस राष्ट्रवादी यांनी आघाडी करून जनतेची मते मागितली. जनतेने युतीला सत्तेवर बसण्याचा कौल दिला, तर आघाडीला विरोधी बाकांवर बसण्याचा जनादेश दिला. मात्र युतीमध्ये अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून प्रचंड मोठा वाद पेटला. कोण म्हणतेय शब्द दिला, कोण म्हणतेय शब्द दिलाच नाही, अशा सर्व भांडणात या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. साहजिकच एकमेकांना धडा शिकविण्यासाठी या दोन्ही पक्षांनी आधी महिनाभर राज्याला अस्थिर केले आणि आता हेच दोन्ही पक्ष पुन्हा राज्याला स्थिर करण्यासाठी विरोधकांचे सोगे धरत आहेत. राजकारणात सातत्याने परिस्थिती बदलत राहते. जो राजकीय पक्ष परिस्थितीनुसार बदलत नाही तो काळाच्या ओघात मागे पडत राहतो. मतदार नेमके काय म्हणतील, आपल्या बदलत्या भूमिकेला स्वीकारतील का याचा योग्य अंदाज बांधण्याचे कामही राजकीय पक्षांना करावे लागते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या भूमिकेचे पुढे काय होईल? राम मंदिर उभारण्यासाठी शिवसेना कसा पुढाकार घेणार? मराठी माणूस, भूमिपुत्रांच्या हक्कासाठीच्या लढाईचे पुढे काय होणार? या व इतर अनेक प्रश्‍नांचे भुंगे शिवसेनेच्या मागे यथावकाश लागणार आहेत. मात्र आत्ताच्या क्षणी शिवसेना या सगळ्यांची पर्वा करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. राज्यात भाजपसोबत राहून स्लो पॉयझनप्रमाणे मरायचे किंवा अन्य पक्षांसोबत साटेलोटे करीत भाजपलाच मारायचे, अशी परिस्थिती समोर असल्याने शिवसेना त्यांच्या डीएनएनुसार मारणार्‍याच्या भूमिकेत शिरल्याचे पहायला मिळते.
सत्तेतील कोंडमारा आणि नंतर आपल्याच पक्षाची फोडाफोड, अशा दुधारी तलवारीचा घाव भाजपकडून कधी बसेल याचा नेम नव्हता. त्यामुळे शिवसेनेने भाजपच्या विरोधात कधी नव्हे ती सर्व शक्ती एकवटलेली असून भाजपला नामोहरम केल्याशिवाय ते राहणार नाहीत असे दिसते काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडण्यासाठी शिवसेनेने नेहमीच आघाडी घेतली आहे. बांग्लादेशी मुस्लिमांचे लांगुलचालन केल्याचे, देशात जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातल्याचे एक ना अनेक आरोप शिवसेनेने काँग्रेसवर केले आहेत, तर हिंदुत्वाची नेहमीच पाठराखण करणार्‍या तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी परप्रातियांच्या विरोधात बडगा उगारणार्‍या शिवसेनेलाही काँग्रेसने नेहमीच लक्ष्य बनविले आहे.
शिवसेनेने शरद पवार यांचा बारामतीचा म्हमद्या असा केलेला उल्लेख राष्ट्रवादीचे नेते अजूनही पचवू शकलेले नाहीत. मुंबई महापालिकेच्या रस्त्या घोटाळ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात घातलेल्या गोंधळाची शिवसेनेच्या मनातअजुनही राग  आहे. त्यामुळे शिवसेना हा सर्व इतिहास विसरली आहे असे बिल्कुल नाही. मात्र भाजपकडून शिवसेनेला संपविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, शंभर शकले होण्यापासून पक्षाला वाचवायचे असेल तर हीच ती वेळ, असे म्हणत शिवसेना नेतृत्वाने शरद पवारांसोबत सोयरीक केलेली आहे.
एकूणच गेल्या महिन्याभरातील अस्थिर वातावरण, आमदारांची या हॉटेलमधून त्या हॉटेलमधील ने आण, रातोरात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी, पहाटे पावणे पाचवाजता हटवली गेलेली राष्ट्रपती राजवट या सर्व घडामोडी पाहून मतदार पुरते चक्रावून गेले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे खुद्द शरद पवार स्वत: मैदानात उतरले असल्याने या उत्सुकता वाढलीच आहे. ठरल्याप्रमाणे शिवसेनेचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळे भाजपचे बारा वाजतील.अश्या पध्दतीने आजके दोस्त कलके दुश्मन ही उक्ती सध्या लागु पडत आहे.
लेखक
रंजन साळवी