Breaking News

नक्षलवाद्यांनी डंपर, जेसीबीसह नऊ वाहने पेटवली

दंतेवाडा
छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी रविवारी एका डंपर व जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. कालच झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस हुतात्मा झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी नऊ वाहने पेटवून दिली. त्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यातील जंगलात शनिवारी सकाळी सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलाने मुलेर गावानजीकच्या जंगलात घुसखोरीविरोधी मोहीम हाती घेतली असता ही चकमक उडाली, असे सुकमाचे पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा म्हणाले. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात ‘डीआरजी’(डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. कडती मुत्ता असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झालेल्या ठिकणावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. या अगोदर छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला होता. तर, दंतेवाडा जिल्ह्यातील काटेकल्याण येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे. 15 सप्टेंबर रोजी सुकमा जिल्ह्यात जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते.