Breaking News

15 वर्षांपासून फरार बाबासाहेब साळवेला अटक


देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी ः
खून, दरोडे महामार्गावरील जबरी चोरी अशा गुन्ह्यांमध्ये 15 वर्षांपासून फरार असलेला बल्ली ऊर्फ बाबासाहेब भाऊसाहेब साळवे (राहणार शिंगवे नाईक, ता. नगर) याला राहुरी पोलिसांनी अटक केली.
पोलिस अप्पर अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात या कारवाईची माहिती दिली. औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यात बाबासाहेब साळवेचा सहभाग होता. अनेक पोलिसपथके त्याच्या शोध घेत होती.
                 बाबासाहेब हा राहुरी तालुक्यातील वावरथ जांभळी परिसरातील जंगल परिसरात  राहत होता. वेषांतर करून अनेक गुन्हे त्याने केलेले आहेत. गुन्हेगारांच्या टोळ्याही तो तयार करत होता. म्हैसगाव परिसरात शनिवारी रात्री तो येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली होती. त्यानंतर या परिसरात सापळा लावण्यात आला. रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकलवर तो भरधाव जात असल्याची खात्री पटताच राहुरीच्या पोलिस पथकाने  त्याचा पाठलाग सुरु केला. या पथकात पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याबरोबर सोमनाथ जायभाय, प्रवीण खंडागळे, आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे आदींचा समावेश होता.
पाठलाग सुरू असल्याचा सुगावा लागताच मोटारसायकल सोडून तो परिसरातील  जंगलात सैरावैरा पळू लागला. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तो तेथे अडखळला. त्यावेळेस पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
 त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. राहुरी, पारनेर, लोणी, राहाता, कोपरगाव अशा अनेक ठिकाणी त्याच्यावर दरोडा आणि इतर शंभर पेक्षाही अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
  श्रीरामपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीच्या पथकाने साळवे याच्यावर कारवाई केली. या कामगिरीबद्दल राहुरी पोलिसांना विशेष बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राहुरी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा प्रभारी अधीक्षक सागर पाटील यांनी विशेष बक्षीस राहुरी पोलीस पथकाला जाहीर केले आहे .