Breaking News

मराठी भाषेची उपेक्षा !


मराठी ही आपली राजभाषा असली, तरी तिची कायमच आपल्याचकडून उपेक्षा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मात्र केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे मराठी भाषेच्या पदरात अभिजात भाषेचा दर्जा पडेल असेतरी सध्या दिसत नाही. दुसरे म्हणजे, गुरुवारी सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल यांनी मराठी भाषेवरुन चांगलेच चिमटे काढले. या कार्यक्रमात बोलतांना राज्यपाल म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुलगुरुंचे कौतुक केले. संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे. अशात संस्कृतमधून सुत्रसंचालन केल्याचे समाधान कोश्यारी यांनी व्यक्त केलं. तर उपस्थित पाहुण्यापैकी कोणीच मराठीत भाषण केलं नाही यावरुन राज्यपालांनी कानपिचक्या ही काढल्या. मी उत्तराखंडमधून आल्यानंतर मराठीत शपथ घेतली. ज्याची चर्चा सर्व माध्यमातून झाली. मात्र, यात विशेष काही नाही, महाराष्ट्रात असाल तर मराठी शिकणे गरजेचे आहे. मात्र, या कार्यक्रमात कोणीच मराठीत भाषण केलं नाही. कुलगुरुंनी ही इंग्रजीत भाषण केलं. किमान आभार तरी मराठीत मानावे असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिमटे काढले. सांगण्याचे तात्पयृ म्हणजे, मराठी राज्य असलेल्या महाराष्ट्रातच आपण मराठीची उपेक्षा करतो. मराठी ही महाराष्ट्राची भाषा. जगात तिचा भलेही गौरव होत असेल; परंतु अजूनही मंत्रालयाच्या दारात ती फाटकी वस्त्रे धारण करूनच उभी आहे. कुसुमाग्रज यांनी मरठी भाषेच्या अधोगतीबद्दल जी खंत व्यक्त केली होती, ती अजूनही कायम आहे. भलेही मराठीला पैठणी नेसवून मंत्रालयाच्या दारात उभी करू, असे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पाच वर्षांपूर्वी सांगितलेले असेल; परंतु तसा काही अनुभव महाराष्ट्राला येत नाही. उलट, मराठी माणूस आता केवळ मुंबईबाहेरच फेकला गेला नाही, तर तो ठाणे-रायगडमधूनही बाहेर फेकला गेला. मराठी भाषा वैभवसंपन्न बनून मंत्रालयाच्या दारात पैठणी नेसून उभी असलेली दिसेल असे सांगत लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असे तावडे यांनी पाच वर्षांपूर्वी सांगितले होते; परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर नाहीच; परंतु तिची उपेक्षा आणखी वाढली आहे.  मराठी पुस्तके वाचली जावी यासाठी ‘पुस्तकांचे गाव’ संकल्पना तयार करण्यात आली आहे. गावांतच फक्त मराठी टिकून आहे. तिथे वाचन संस्कृती वाढलीच पाहिजे; परंतु मराठी भाषा टिकवण्याचे खरे आव्हान महानगरांत आहे. मराठी साहित्याच्या विक्रीसाठी नगरपालिका तसेच महापालिकांमधील गाळे पुस्तक विक्रीसाठी स्वस्तात भाडयाने उपलब्ध करून देण्याची योजना, आगामी पंचवीस वर्षांसाठी मराठी भाषा विकासाचे धोरण, मराठीची गोडी शाळेतील मुलांमध्ये निर्माण व्हावी तसेच सीबीएससी व आयसीआयसीमध्येही मराठी भाषेचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा तावडे यांनी केली होती. त्यापैकी कितींची पूर्तता झाली, हा संशोधनाचा भाग ठरेल. संत ज्ञानेश्‍वरांनी अमृताची उपमा मराठी भाषेला दिली असली, तरी हे अमृत जपण्याऐवजी वाघिणीच्या दुधाला जास्त महत्त्व दिले जात आहे.
मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या, तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे; पण मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे. प्रत्येक मुंबईकर मूळचा कुठला आहे, त्यासंदर्भात संख्यात्मक विश्‍लेषण करणारी अलीकडची कुठलीही माहिती उपलब्ध नाही; परंतु मराठी माणूस अगोदर दक्षिण मुंबईतून उपनगरात, उपनगरातून ठाणे जिल्ह्यात हद्दपार झाला आहे. आता तर मराठी माणसे दुर्बिण घेऊन शोधावी लागत आहेत. मातृभाषे संदर्भातला 2011 सालचा जनगणनेचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे. 2001 मध्ये मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 25.88 लाख होती. 2011 मध्ये हेच प्रमाण 35.98 लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत 2.64 टक्के घट झाली. 2001 साली 45.23 लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. 2011 मध्ये हेच प्रमाण 44.04 लाख झाले. अजूनही मराठी मातृभाषा असल्याचे सांगणार्‍यांचे प्रमाण हिंदी भाषिकांपेक्षा चार टक्क्यांनी जास्त असले, तरी मराठी भाषिकांच्या प्रमाणात होणारी घट आणि हिंदी भाषिकांची वाढणारी संख्या पाहता मुंबई हे मराठी भाषकांचे नव्हे, तर हिंदी भाषकांचे शहर झालेले असेल. मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. आधी मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागातून नागरिक येऊन स्थायिक झाले. ज्यातील बहुसंख्याची बोलीभाषा मराठीच होती; परंतु संपामुळे कापड गिरण्या बंद पडल्या. कापड उद्योगातील नोकर्‍या कमी झाल्यानंतर मुंबईत उत्तर प्रदेश, बिहारमधून स्थलांतर वाढले. अत्यंत स्वस्तात हा कामगार उपलब्ध झाला. मासेमारी आणि त्यावर पूरक उद्योगातील मराठी टक्काही असाच घसरत गेला. आज जगात सहा हजार भाषा बोलत्या जातात. वीस लाख लोक तीनशेच्या वर भाषा बोलतात. भाषिकांच्या संख्येनुसार मराठी भाषा देशातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे, तर जगातल्या असंख्य भाषांमध्ये मोठे समूह बोलणार्‍यांमध्ये मराठीचा पंधरावा क्रमांक लागतो. कोणत्याही राज्याचा नागरिक हा ज्या राज्यात वर्षानुवर्षे राहतो, त्याला त्या राज्याची मातृभाषा शिकणे, बोलणे अनिवार्य असायलाच पाहिजे. कारण प्रत्येक राज्याचा कारभार हा त्या त्या राज्याच्या भाषेत चालतो; परंतु महाराष्ट्रात मराठीचा द्वेष असणार्‍यांनी या गोष्टीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने मराठीबाबत आग्रही भूमिका घेतली नाही. साडेपाच दशकांपूर्वी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेची स्थिती बदलणे शक्य होते; परंतु तेवढी समज असलेले नेतृत्व महाराष्ट्राला लाभले नाही. मराठी संस्कृती, मराठी माणूस, मराठी भाषा यांच्याशी जणू काही देणेघेणे नाही, असे राज्यकर्त्यांचे वागणे राहिले. त्यामुळेच मराठी भाषेची उपेक्षा होतांना दिसून येत आहे.