Breaking News

सोनई हत्याकांडातील पाच जणांची फाशी कायम

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

Sonai accused
अहमदनगर
राज्यात खळबळ उडवून देणार्‍या अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांडातील पाच आरोपींची फाशीची शिक्षा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. मात्र यातील अशोक नवगिरे या सहाव्या आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
नाशिकच्या सत्र न्यायालयाने या हत्याकांडातील सहाही आरोपींना 2018 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आज त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने प्रकाश विश्‍वनाथ दरंदले, रमेश विश्‍वनाथ दरंदले, पोपट विश्‍वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुर्‍हे या पाचजणांना फाशीची शिक्षा सुनावली असून अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2013 मध्ये अहमदनगरच्या सोनई गावात हे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. 2013 मध्ये अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई गावात ऑनर किलिंगची घटना घडली होती. प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे तुकडे करून सेफ्टिक टँकमध्ये टाकण्यात आले होते. खर्डा आणि जवखेड प्रकरणाच्या आधीची ही घटना आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई गावात 2013 मध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. संदीप राज थनवार (वय 24), राहुल कंडारे (वय 26) आणि सचिन घारू (वय 23) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले होते. सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणार्‍या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्‍वनाथ दरंदले, प्रकाश विश्‍वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुर्‍हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना 1 जानेवारी 2013 रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणार्‍या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.