Breaking News

संभाजी महाराजांचा पुतळा प्रोफेसर चौकात उभारावा

अहमदनगर/प्रतिनिधी : “सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित केलेला संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा तातडीने बसवावा’’, अशी मागणी विनायक राज प्रतिष्ठानच्या वतीने खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ प्रोफेसर चौकात असणार्‍या नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी करीत असूनही याचा ठराव मंजूर होऊन दहा वर्ष उलटलेली आहेत. या संबंधित मूर्तिकारास रक्कमही पोहोच झालेली आहे. आता इच्छाशक्तीचा अभाव व कायदेशीर परवानगी यामध्येही प्रकरण प्रलंबित आहे. तरी आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रलंबित असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यात यावे’’, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपुल वाखुरे व उपाध्यक्ष विनय वाखुरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा. डॉ. विखे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे उपस्थित होते.