Breaking News

आरोप प्रत्यारोप व गोंधळाने गाजली पाथर्डी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा

पाथर्डी- (प्रतिनिधी) - नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आरोप प्रत्यारोप, गोंधळ, वैतागलेल्या महिलेकडुन भर सभेमध्ये शिरकाव करत अंगावर रॉकेल ओतुन घेण्याचा प्रयत्न, सत्ताधारी नगरसेवकांनी लाईट व आरोग्य विभागाच्या ठेकेदारीच्या मुद्यांवरून एकमेकांत शाब्दिक चकमक अशा वातावरणात पालिकेची सर्व साधारण सभा संपन्न झाली. गेल्या चार पाच दिवसापासून लिंगायत समाजाच्या स्मशानभुमिसह भुखंड आरक्षण मुद्यावरुन नगरसेवकांनी सभागृहाला चांगलेच धारेवर धरले.

पालिकेविरुद्ध झालेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेची सभेच्या चर्चेमध्ये राजकारण, पक्षांतर्गत खदखदीची पार्श्‍वभूमी बैठकीला होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, तर व्यासपीठावर उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर उपस्थित होते. बैठकीला प्रारंभ होताच नगरसेविका दिपाली बंग यांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या अधिकारी व पदाधिकार्‍यांना धारेवर धरत एलईडी दिव्यांचा ठेकेदार कोण, तो सभागृहासमोर उपस्थित का केला जात नाही. ठेकेदाराला पुढे उभे करा नंतर सभा चालवा सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवीकेनेच वातावरण तापवायला प्रारंभ केल्याने नगराध्यक्ष गडबडले. सारवासारव करत या मुद्द्यावर सभेच्या शेवटी चर्चा करु असे सांगितल्यावर कामकाज सुरू झाले. उपनगराध्यक्ष बजरंग घोडके यांनी अचानक आक्रमण होत ठेकेदाराची चौकशी करून त्वरित ठेका रद्द करा. पुढील बैठकी पर्यंत कारवाई न झाल्यास आपण बैठक चालु देणार नाही. गुन्हा दाखल करा नाहीतर अटक करा अशी मागणी केली.
पालिकेच्या गाळे हस्तांतर व नवीन कराराबाबतही गरमागरम चर्चा होऊन सभागृहाच्या पुर्व परवानगी शिवाय गाळे धारकांनी गाळे हस्तांतर कसे केले असा प्रश्‍न नंदकुमार शेळके यांनी विचारत नोटरी करुन किंवा कर भरणा करुन झालेल्या व्यवहाराची पडताळणी करण्याची सुचना केली. सभेच्या प्रारंभी शहनवाज शेख यांनी आसरा नगर मधील रस्त्याच्या कामासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ मुलाबाळांसह सभागृहात प्रवेश करत निषेध फलक असलेले कापड अंगावर गुंडाळून घोषणाबाजी केली. कामाला त्वरित सुरुवात करुन महिन्याभरात काम पुर्ण करू असे सांगितल्यावर आंदोलन मागे घेतले. शहरातील आरोग्याचा ठेका चालवणार्‍या ठेकेदाराचे काम असमाधानकारक ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेच्या मध्यंतरी अतिक्रमणाच्या मुद्यावरुन त्रस्त झालेल्या मीना बांगर यांनी तिव्र संतापात सभागृहात प्रवेश करत हातातील रॉकेलचा ड्रम अंगावर ओतुन घेण्याचा प्रयत्न केला. पालिका कर्मचारी व अन्य पदाधिकारी यांनी बांगर यांना रोखुन धरत प्रश्‍न समजून घेतला .नगराध्यक्ष डॉ.गर्जे यांनी विविध मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले.यावेळी झालेल्या चर्चेत सविता भापकर ,महेश बोरुडे, दुर्गा भगत, आशिया मण्यार आदिंनी भाग घेतला.