Breaking News

हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना फाशी ; एकाला जन्मठेप


हैद्राबाद/वृत्तसंस्था : शहरातील गोकुळ चाट आणि लुंबिनी पार्क येथील 2007 च्या बॉम्बस्फोटप्रकरणाचा अंतिम निकाल समोर आला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने तिघा दोषींपैकी दोघांना फाशी तर अन्य एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इस्माईल चौधरी आणि अनिक शफिक सईद ही फाशीची शिक्षा ठोठविण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी तारीक अंजुमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने तारीक अंजूम यालाही दोषी ठरविले होते. त्याच्यावर बॉम्बस्फोटानंतर मुख्य आरोपींना आश्रय देण्याचा आरोप होता. तेलंगणा पोलिसांच्या गुप्तचर विभागाने याप्रकरणी 5 आरोपींना अटक केली होती. यातील संशयित फारुक शराफुद्दीन तरकीश आणि मोहम्मद सादिक इस्सर अहमद शेख यांची 4 सप्टेंबरला न्यायाधीश टी. श्रीनिवास राव यांनी निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. यावर्षी जूनमध्ये चेरालपल्ली मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातील हॉलमध्ये याची पुढील सुनावणी करण्यात आली.