Breaking News

कमानीला ‘क्रांतीज्योती सावित्रीआई फुलेनगर’चा फलक लावा


नगर । प्रतिनिधी -
मार्केट यार्ड येथील महात्मा फुले चौकात उभारलेल्या कमानीला ‘क्रांतीज्योती सावित्रीआई फुलेनगर’चा फलक लावण्याची मागणी राऊ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल रासकर यांनी महापौर सुरेखा कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, सावता माळी युवक संघाचे अध्यक्ष सचिन गुलदगड, नितीन भुतारे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. रासकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षी सन 2017 मध्ये सारसनगर भागातील नागरिकांनी महापौरांची भेट घेऊन या भागाला ‘क्रांतीज्योती सावित्रीआई फुलेनगर’ असे नामकरण करावे, असे निवेदन दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेत ठराव मंजूर करुन घेण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले चौकात नारळ वाढवून कमान देखील उभी राहिली. परंतु या कमानीला ‘क्रांतीज्योती सावित्रीआई फुलेनगर’चा फलक अद्यापही लावण्यात आलेला नाही. आपणाकडे वेळोवेळी मागणी करुनही व मनपाच्या अधिकार्‍यांना भेटून सविस्तर चर्चा केली. परंतु अद्यापही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी लवकरात लवकर हा फलक बसविण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. यावेळी महापौर कदम यांनी संबंधित अधिकार्‍यांना बोलावून वरील कामाची माहिती घेतली. लवकरात लवकर या ठिकाणी नावाचा फलक बसविला जाईल, असे आश्वासन दिले.