Breaking News

ओंबळे यांच्या स्मारकाचे काम गतीने करणार; आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही


केळघर (प्रतिनिधी) : बोंडारवाडी धरणास तत्वतः मंजूरी राष्ट्रवादीचे सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यामुळे केवळ निवडणुका आल्या की, धरणाचा प्रश्न निमार्ण करून तो प्रश्न सोडण्याऐवजी भिजत ठेवून लोकभावनेशी खेळणे हे आमच्या राजघराण्याच्या रक्तात नाही. बोंडारवाडी धरणाबरोबर नांदगणे-बोंडारवाडी रस्त्याचे काम, केडंबे-भिलार रस्ता, वाहिटे-भुतेघर रिंग रोड आदी केळघर विभागातील कामे प्राधान्याने करून 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या कार्याचे स्मरण युवापिढीस राहावे म्हणून केडंबे या त्यांच्या जन्मगावी यथोचित स्मारकाचे काम अधिक गतीने मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

केडंबे (ता. जावली) येथे आंबेघर गणातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन तसेच विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन कायर्क्रमाचे तालुका राष्ट्रवादीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामभाऊ शेलार, जिल्हा परिषद सदस्या सौ. अचर्नाताई रांजणे, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, कांताबाई सुतार, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष सागर धनावडे, बाजार समितीचे संचालक सुनील देशमुख, शिवाजी गोरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय उतेकर, केडंबेचे सरपंच सौ. वैशाली जंगम, उपसरपंच प्रकाश ओंबळे, विकास सोसायटीचे अध्यक्ष बंडोपंत ओंबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत ओंबळे, बाळकृष्ण ओंबळे, बबनराव बेलोशे, विकास ओंबळे, केळघरचे सरपंच रविंद्र सल्लक, नांदगणेचे सरपंच रविंद्र कारंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी एव्हरेस्ट शिखर सर केल्याबद्दल आमदार भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल पांडुरंग ओंबळे, महादेव ओंबळे, धोंडिबा ओंबळे, आनंदा जंगम यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा तुकाराम ओंबळे स्वागत कमानीचे भूमीपूजन व विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

या मेळाव्यात मोहाटचे शिवसेनेचे कार्यकर्ते बापू सपकाळ यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. याप्रसंगी आदिनाथ ओंबळे, गणपत ओंबळे, महादेव ओंबळे यांनी मनोगत व्यक्त केले. बाळकृष्ण ओंबळे यांनी सूत्रसंचालन केले. कायर्क्रमास आंबेघर गणातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.