Breaking News

महाशिबिरात पोलिसांच्या उपक्रमांचे झाले कौतुक


बीड, (प्रतिनिधी)- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्रीमध्ये पार पडलेल्या महाशिबिरात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तथा राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय ओक यांनी बीड पोलिसांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन अशा प्रकारचे उपक्रम इतर जिल्ह्यांनी राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
 
जिल्हा पोलिस दलाने मागील दोन वर्षांपासून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. रविवारी साक्षाळपिंप्रीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने घेण्यात आलेल्या महाशिबिरामध्ये पोलिस दलाचाही स्टॉल होता. यावेळी प्रमुख अतिथी असलेल्या न्या. ओक, न्या. रविंद्र बोर्डे, न्या. घुगे यांच्यासह जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, पोलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी या स्टॉलला भेट दिली. बिंदुसरा पोलिस पब्लिक स्कूलचे प्रा. प्रशांत जोशी, सखी सेलच्या स्वयंसेविका तथा सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी पोलिस दलाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती मान्यवरांना दिली. महिला मुलींसाठी असलेल्या कायद्याची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेले स्वयंसिद्धा पुस्तिका, बालक व ज्येष्ठांसाठी सुरु करण्यात आलेली हेल्पलाइन, शासनाच्या अनुदानाशिवाय चालणारा मराठवाड्यातील पहिला सखी सेल, संरक्षण दलातील जवानांच्या कुटुंबियांसाठी सुरु करण्यात आलेला आर्मी सेल, बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेला इम्प्लॉयमेंट सेल, वॉटर फिल्टर व उद्यान, तक्रारदारांना सन्मापूर्वक दिला जाणारा मुद्देमाल, महिला पथक, रोजगार मेळावा, दिवाळी फराळ वाटप व ईद मिलाप, पोलिस कॅन्टीनचे अत्याधुनिकरण, यांची माहिती दिली. न्या. ओक यांनी पोलिसांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करुन तसा अभिप्रायही नोंदवला आहे. याबद्दल कर्मचार्‍यांचे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्वागत केले आहे.